Home /News /mumbai /

'सामना' रंगण्याआधी अमृता फडणवीस यांचं ट्वीट, रश्मी ठाकरेंचं केलं अभिनंदन

'सामना' रंगण्याआधी अमृता फडणवीस यांचं ट्वीट, रश्मी ठाकरेंचं केलं अभिनंदन

अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत रश्मी ठाकरे यांचं या नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन केलं आहे.

    मुंबई, 1 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. एकीकडे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर आक्रमक झाल्या असतानाच रश्मी ठाकरेंकडे ही जबाबदारी आल्याने भविष्यात या दोघींमध्येही राजकीय 'सामना' रंगण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत रश्मी ठाकरे यांचं या नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन केलं आहे. 'सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल रश्मी ठाकरे आपलं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. आपल्या देशात महिला आणि समाजाच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उच्च पदावर अधिक महिलांची आवश्यकता आहे आणि लोकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर त्यांचे मत मांडण्यासाठी हे व्यासपीठ देखील आहे,' असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक 'सामना'च्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर 'सामना'चे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक असणार आहेत. आजपासून त्यांच्याकडे हे पद सुपूर्द करण्यात आलं आहे. 'सामना'ची सुरुवात झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे संपादकपदी होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक राहिले. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे लाभाच्या पदावरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. आजच्या 'सामना'मध्ये संपादक सौ. रश्मी ठाकरे असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्या सामनाचं कामकाज कसं पाहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. हेही वाचा- 'महाविकास आघाडी की दीवार नहीं टूटेगी', मुंबईतील कार्यक्रमात अजित पवारांची तुफान फटकेबाजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासूनच रश्मी ठाकरे या राजकारणात अॅक्टिव्ह दिसत आहेत. त्यामुळे त्या राजकारणात येणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. रश्मी ठाकरेंनी महिला आघाडीचं काम पाहिलं आहे. पण त्या कधीच कोणत्याही पदावर नव्हत्या. पण आता त्यांच्याकडे 'सामना'चं संपादकपद देण्यात आलं आहे. तर कार्यकारी संपादक म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत काम पाहणार आहेत. 'सामना' हे आतापर्यंत शिवसेनेचे विचार लोकांपर्यंत मांडण्याचं माध्यम ठरलं आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हा वसा उद्धव ठाकरेंनी जपला. आता रश्मी ठाकरे या शिवसेनेची भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेची कार्यपद्धती, सामनाचे अग्रलेख यावर आता रश्मी ठाकरे यांचे विचार दिसणार आहेत. त्यामुळे आताचा शिवसैनिक रश्मी ठाकरे यांना कसा स्वीकारतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amruta fadanvis, BJP, Shivsena

    पुढील बातम्या