'बांगड्या' वक्तव्यावरून आता अमृता फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर विखारी टीका, म्हणाल्या...

'बांगड्या' वक्तव्यावरून आता अमृता फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर विखारी टीका, म्हणाल्या...

पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला होता

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली आहे.

शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, पण भाजपनं नाही असं मंगळवारी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. बांगड्या हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं होतं. आता अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटला रिट्वीट करून उत्तर दिलंय. 'कोषात वाढलेल्या रेशीम किड्याला आयुष्यातली मजा काय कळणार? पूर्वजांनी विणून ठेवलेल्या आयत्या वलयात गर्भरेशमी आयुष्य ते जगत असतात' अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

तसंच, देवेंद्र फडणवीस, तुमच्या संघर्षाचा मला अभिमान असून भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता हा कठोर परिश्रम करत आहे, असं कौतुकही त्यांनी केलं.

आदित्य ठाकरेंची टीका

राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीसांनी शिवसेनेवर जी टीका केली होती त्यावरून आदित्य यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केलं होतं त्यावरून आदित्य यांनी निशाणा साधलाय.

माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नाही. देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र, तुम्ही भाषणात शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही अशी टीका केली होती. बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही. त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र, टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजेट, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.

काय म्हणाले होते फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारनं पहिल्या दिवसापासून सुरू केली. आम्ही लढून पुन्हा सत्तेत येऊ. आम्हाला आमच्या विश्वासघाताची चिंता नाहीये, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची आहे. तुम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे.

या पावसामुळे एखाद्याचा 18 वर्षांचा मुलगा गेल्यावर जसं वाटेल तसं पावसामुळे पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं आहे. आम्ही काळजीवाहू सरकार असताना शेतकऱ्यांना 10 हजार कोटी दिलेत. नवं सरकार आम्हाला मदत करेल असं शेतकऱ्यांना वाटलं. मात्र पूर्ण अधिवेशन झालं तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करु असं यांनी सांगितलं होतं.

आम्ही जाहीरनाम्यात नसताना शेतकरी कर्जमाफी दिली होती. किमान समान कार्यक्रमातही हे आश्वासन दिलं पण शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सुरु केलं. याच दराने यांनी कर्जमाफी केली तर 460 महिने कर्जमाफीला लागतील. तितका काळ हे सरकार तरी राहील का? आज धानाच्या खरेदीत भ्रष्टाचार होतोय. मराठवाडा वॉटर ग्रीडला यांनी स्थगिती दिली.

First published: February 26, 2020, 5:08 PM IST

ताज्या बातम्या