तलाठ्यांच्या दाखला बंद आंदोलनामुळे चिमुरड्या 'श्री'चा जीव धोक्यात !

तलाठ्यांच्या दाखला बंद आंदोलनामुळे चिमुरड्या 'श्री'चा जीव धोक्यात !

राज्यात तलाठ्यांनी सुरू केलेलं दाखला बंद आंदोलन अमरनाथमधील एका चिमुरड्याच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झालाय. उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने या चिमुरड्याच्या ह्रदयशस्त्रक्रियेसाठी मिळणारी शासकीय मदत शासकीय लालफितीत अडकलीय.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

अंबरनाथ, 24 ऑक्टोबर : राज्यात तलाठ्यांनी सुरू केलेलं दाखला बंद आंदोलन अमरनाथमधील एका चिमुरड्याच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झालाय. उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने या चिमुरड्याच्या ह्रदयशस्त्रक्रियेसाठी मिळणारी शासकीय मदत शासकीय लालफितीत अडकलीय.

अंबरनाथचे रहिवासी योगेश साठे यांची दीड महिन्यांपूर्वी मुलगा झाला पण त्याच्या ह्रदयाला जन्मतःच 6 छित्रं असल्याचं आढळून आलंय. या चिमुरड्यावर सध्या मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी अंदाजे 3 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या ऑपरेशनसाठी राज्य शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गंत आर्थिक मदतही मंजूर झालीय. पण त्यासाठी मुलाच्या वडिलांचा म्हणजेच योगेश साठे यांचा उत्पन्न दाखला जोडणं आवश्यक आहे. हा उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी योगेश साठे गेल्या 10 दिवसांपासून अंबरनाथ तहसील कार्यालयात हेलपाटेही मारताहेत. पण तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी दाखला बंद आंदोलन सुरू केल्यानं योगेश साठे यांना उत्पन्नाचा दाखला मिळत नाहीये. त्यामुळे या चिमुरड्या 'श्री'चं ऑपरेशन आर्थिक मदतीविना लांबणीवर पडत चाललंय.

योगेश साठे हे अंबरनाथ पालिकेच्या कचरा गाडीवर साधे कंत्राटी कामगार आहेत. त्यामुळे चिमुरड्या 'श्री'चा जीव वाचवण्यासाठी ते शासन दरबारी मदतीची याचना करताहेत. पण अजूनही संबंधीत तलाठ्याच्या ह्रदयाला मायेचा पाझर फुटलेला दिसत नाही. म्हणूनच थेट मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालून या चिमुरड्याच्या ऑपरेशनसाठी तातडीची आर्थिक मदत मिळून द्यावी, अशी मागणी मुलाचे वडिल करताहेत.

तलाठ्यांचं दाखला बंद आंदोलन कशासाठी ?

राज्यातील नागरिकांना विविध प्रकारचे दिले जाणारे दाखले कोणत्या नियमाखाली दिले जातात. याबाबत महसूल विभागाचे काही परिपत्रक, सूचना अथवा काही कायदेशीर तरतूद आहे का? अशी विचारणा जळगाव जिल्हा न्यायालय तसेच नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्याने केल्यानंतर राज्यातील तलाठ्यांनी "दाखला देणे बंद' आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अंबरनाथ तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी देखील सहभागी झाले आहेत. हे दाखले देण्याबाबत कोणतीच तरतूद नाही. त्यामुळे शासनाने आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 08:20 PM IST

ताज्या बातम्या