मुंबई, 17 मार्च : देशातल्या वाढत्या coronavirus प्रादुर्भावाचं महाराष्ट्र केंद्र बनत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शहरं बंद करायची का, वाहतूक व्यवस्था बंद करायची का याविषयी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या बैठकीत मोठा निर्णय घेण्याचं सरकारने सध्या तरी टाळलं आहे. मात्र आवश्यकता भासल्यास सरकारकडून तसा निर्णय घेतला जाऊ शकतो.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला,' असं ट्वीट केलं होतं. मात्र त्यांनी नंतर ते ट्वीट डिलीट केलं.
दरम्यान, राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे. राज्यात पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष सागलं होतं. मात्र लगेच असा निर्णय घेण्याचं सरकारने टाळलं आहे.
वाचा - कोरोनाचा परिणाम प्लॅटफॉर्म तिकीटांवर, गर्दी टाळण्यासाठी दर 10 वरून थेट 50 रुपयेमहाराष्ट्रात सध्या लॉकडाउन नाही
सध्या सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा , स्विमिंग पूल, सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र संपूर्ण लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. सध्या चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. जर्मनी आणि फ्रान्सनेही संपूर्ण लॉकडाउन घोषित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.