Home /News /mumbai /

'शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही', अजित पवारांचं मोठं विधान

'शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही', अजित पवारांचं मोठं विधान

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपचा सरकार अस्थितर करण्याचा प्रयत्न असल्याचं विधान केलं आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळं विधान केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात जावून सहभागी झाले आहेत. हे सर्व आमदार आसामच्या गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आधी सुरतमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना एअर लिफ्टिंग करुन गुवाहाटीला नेलं गेलं. शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपचा सरकार अस्थितर करण्याचा प्रयत्न असल्याचं विधान केलं आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळं विधान केलं आहे. शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबई वाय. बी. चव्हाण सेंटर इथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना शिवसेनेच्या आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शिवसेनेच्या बंडामागे भाजपता हात दिसत नाही, असं स्पष्ट विधान केलं. तसेच आताच्या घडीला भाजपचा कुठलाही नेता किंवा मोठा चेहरा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जावून काहीतरी करतोय ते आतातरी दिसत नाहीय, असं अजित पवार म्हणाले. याबाबत पत्रकार पुढे प्रश्न विचारत असताना अजित पवारांनी "मी मोठ्या नेत्याची गोष्ट करतोय", असं म्हणत आपली भूमिका मांडली. अजित पवार आणखी काय म्हणाले? "आमच्या सरकारमधील काही मित्रपक्ष थोडं वेगळं विधान करत आहेत. अजित पवार असं करतात तसं करतात. मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे, सरकार अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं त्यावेळी 36 पालकमंत्री नेमतो. त्यामध्ये एकतृतीयांश प्रत्येक पक्षाचे नेमले गेले. त्यांना निधी देत असताना कुठेही काटछाट केली नाही. जो अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि डीपीसी निधी सगळा दिलाय. मी कधीच दुजाभाव केला नाही. उलट मी सगळ्यांना विकासकामांमध्ये मदत करण्याची माझी भूमिका असते. अनेकदा मी सकाळी साडेआठ नऊ वाजताच येऊन बसतो आणि प्रश्न सोडवण्याचं काम करतो. त्यांनी असं चॅनलला जावून बोलण्यापेक्षा आमच्या एकत्र चर्चेत सांगितलं असतं तर तिथल्या तिथे समज-गैरसमज दूर झाले असते. तिघांची आघाडी आहे. तिघांनी ही आघाडी कशी टिकेल याचा प्रयत्न करायला हवा होता", असं अजित पवार म्हणाले. "राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्व आमदर आणि खासदारांची बैठक झाली. सध्या महाराष्ट्रात जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत माझ्या पाठोपाठ जयंत पाटीलही सांगतील. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा देवून हे सरकार टिकवण्याचे प्रयत्न करणार आहे. मी दुपारी देखील मुख्यमंत्र्यांशी बोललो. आदित्य ठाकरे यांच्यासोबत बोललो. माझी मीडियाला विनंती करतो, या पेक्षा कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. शिवेसेनेत काही प्रश्न निर्माण झाली आहे. काही आमदार प्रमुख आलेले आहेत. त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. तिकडे जे आमदार आहेत त्यांना आवाहन करण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आमची भूमिका आघाडी सरकारला टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्या बाजूने आहेत", असा दावा अजित पवारांनी केला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या