Home /News /mumbai /

खातेवाटपाबाबत पुढील 24 तास महत्त्वाचे, अजितदादांनी वाढवला सस्पेन्स

खातेवाटपाबाबत पुढील 24 तास महत्त्वाचे, अजितदादांनी वाढवला सस्पेन्स

महाविकासआघाडीचा विस्तार झाल्यानंतर दोन दिवसांमध्ये होणाऱ्या खातेवाटपाबाबत अजूनही कोणताच निर्णय झाला नाही.

  मुंबई, 01 जानेवारी : महाविकासआघाडीचा विस्तार झाल्यानंतर दोन दिवसांमध्ये होणाऱ्या खातेवाटपाबाबत अजूनही कोणताच निर्णय झाला नाही. तिन्ही पक्षाच्या झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील 24 तासात खातेवाटप जाहीर होईल, असं मला वाटतंय, असं सांगून आणखी सस्पेन्स वाढवला आहे. पण, निर्णय जाहीर होईलच याबद्दल स्पष्टपणे सांगू शकले नाही. आज महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची  खातेवाटपाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकासआघाडी सरकार हे तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून स्थापन केले आहे. त्यामुळे खातेवाटपाबाबत पक्षानुसार सविस्तर चर्चा झाली. खातेवाटपाबाबत जवळपास निर्णय झाला आहे. याची घोषणा उद्यापर्यंत होईल असं मला वाटतंय. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, असं अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खाटेवाटपाची यादी ही शरद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, याबद्दल ते अंतिम निर्णय घेतील, असंही अजितदादांनी सांगितलं. तसंच या बैठकीमध्ये पालकमंत्री वाटपाबद्दलही चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आज दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेत्यामध्ये खातेवाटप बाबत खलबतं सुरूच होती. पण अजूनही अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर नाही. सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवनियुक्त मंत्री अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांची पहिल्यांदा सकाळी दहा वाजता स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे बहुतेक सर्व नेते तसंच आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर न उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्वजण पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत खातेवाटप चर्चा केली. या बैठकीत कालांतराने उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सहभागी झाले. बैठकीनंतर बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपात पक्षात कोणताही मतभेद नाही. खातेवाटप आणि शासकीय बंगले वाटप लवकर केले जाईल, असं सांगितलं. रात्री उशिरापर्यंत अधिकृतरित्या मुख्यमंत्री कार्यालय खातेवाटप जाहीर करेल का याची चर्चा मात्र दिवसभर प्रशासकीय पातळीवर राहिली. महाविकासआघाडीचे नेते खातेवाटपाचा तिढा सुटल्याचा दावा करत असतानाच उशिरापर्यंत खातेवाटप जाहीर झालेले नाही. आदित्य ठाकरेंना मिळाली मंत्रालयात खास केबिन! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे कॅबिनेटमंत्रिपदावर विराजमान झाले आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्यासाठी मंत्रालयामध्ये खास केबिन देण्यात आली आहे. महाविकासआघाडीचा विस्तार झाल्यानंतर मंत्रालयामध्ये सर्व मंत्र्यांसाठी कॅबिनचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी आज मंत्रालयामध्ये कॅबिनची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील 717 केबिन असणार आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झालं नाही. त्यामुळे केबिन वाटप ही झालेलं नाही. पण आदित्य ठाकरे यांच्यासाठी एक केबिन मात्र खास राखीव ठेवण्यात आली आहे. या  केबिनवर आदित्य ठाकरे यांचं नाव देखील लिहिले आहे. आज या केबिनची पाहणी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण मुख्यमंत्री कार्यालयासोबत केली. त्यावेळेस आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Ajit pawar, Congress, NCP, Sharad pawar, Shivsena

  पुढील बातम्या