अजित पवारांसोबतच्या बैठकीत गोंधळ, संभाजीराजेंचा अवमान केल्याचा आरोप

अजित पवारांसोबतच्या बैठकीत गोंधळ, संभाजीराजेंचा अवमान केल्याचा आरोप

संभाजीराजेंना बसण्यासाठी मागच्या बाजूची जागा दिली गेल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं. मात्र या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. बैठकीदरम्यान संभाजीराजेंना बसण्यासाठी मागील बाजूची खुर्ची दिली गेल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली.

'बैठकीवेळी संभाजीराजेंनी मागील खुर्ची देण्यात आली. अजित पवार आणि सरकारने जाणीवपूर्वक संभाजीराजेंचा अवमान केला,' असा आरोप बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या इतर समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे बैठकीत काही काळासाठी तणावाचं वातावरण झालं होतं. मात्र नंतर संभाजीराजेंनी संयमाची भूमिका घेतल्याने हा वाद मिटला.

अजित पवारांच्या दालनात पुन्हा बैठक सुरू

संभाजीराजेंच्या आसन व्यवस्थेवरून वाद झाल्यानंतर आता बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक सुरू झाली आहे. यावेळी संभाजीराजेंना अजित पवारांच्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून सारथीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बैठकीला कोण-कोण उपस्थित आहे?

सारथी संस्थेवरून राज्यातील वातावरण तापू लागल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला संभाजीराजे छत्रपती, अजित पवार, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार बैठकीला उपस्थित आहेत. यासोबतच विनायक मेटे आणि मराठा मोर्च्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांचीही या बैठकीला हजेरी आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या संस्थेत संस्थेबाबत जे आंदोलन केलं त्याचा दबाव निर्माण झाल्याने हे निमंत्रण आलं असल्याचं छत्रपती संभाजी यांनी म्हटलेलं होतं. यापूर्वी सरकारने जी आश्वासने दिली ती पाळली नव्हती तरी देखील समाजाच्या हितासाठी आपण या चर्चेला जात असल्याचं छत्रपती संभाजी यांनी सांगितलं होतं.

Published by: Akshay Shitole
First published: July 9, 2020, 12:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading