मुंबई, 10 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे नेते (national congress party) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोरोनावर मात करून पुन्हा एकदा कामाला लागले आहे. अजितदादांनी आज मंत्रालयातून कामाला सुरुवात केली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट मंत्रालयातून एक व्हिडीओ लाईव्ह केला आहे.
अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर आठ दिवस घरीच विश्रांती घेतल्यानंतर अजितदादा पुन्हा एकदा कामाला लागले आहे.
नेहमीप्रमाणे अजितदादा आज मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले होते. हातात ग्लोज आणि तोंडावर मास्क बांधून अजितदादांनी आपल्या कामाला सुरुवात केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादा काम करत असताना एक व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला आहे.
या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना जाऊन एक निवेदन दिले आहे. पण, जेव्हा अजितदादांनी सही करण्यासाठी पेन मागितला तेव्हा सुप्रिया सुळेंनी आपल्याकडील पेन दिला. त्यावेळी 'माझ्या पेनमध्ये सॅनिटाझर आहे', असं सांगत अजितदादांची चेष्टा केली. तसंच, डॉक्टरांनी काम करण्यास सांगितले का? असं सुप्रिया सुळेंनी विचारले असता, अजितदादा म्हणाले की, 'आज मंत्रालयात काम करणार आहे. नंतर पुण्याला जाणार आहे आणि तिथून बारामतीला जाईल.'
अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अजितदादांनी काही दिवस मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेतली होती.