नवी मुंबई, 6 डिसेंबर: राज्य सरकारसह महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती देखील कोरोना संसर्गाचा (Coronavirus) सामना करत आहे. यात नवी मुंबई महापालिका अग्रेसर आहे. मात्र, याच महापालिकेतील काही अधिकारी कोरोना काळात ही आपल्याला कशी बढती मिळेल, मलाईदार खातं कसं मिळेल, याच्याच प्रयत्नात आहेत.
मग याकरीता महापालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याला खास आगरी जेवणाची मेजवानी दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याला घरपोच खिलापत दिली जात आहे.
हेही वाचा...देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आलं व्हिजन
आठवड्याचा दर शनिवारी आणि रविवारी नवी मुंबईच्या गावांमधून अस्सल आगरी आणि कोळी पद्धतीच्या ताजी मासळी, कोंबडी आणि मटणाच्या चमचमीत जेवणाची मेजवानी दिली जात आहे. मेजवानी देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी अग्रेसर आहेत. एका अधिकाऱ्याला आपला विभागच वेगळा करून हवा आहे म्हणून तो आपल्या वरिष्ठाला ही मेजवानी देत असल्याची माहिती मिळाली आहे. आपला बॉस आपल्यावर मेहरभान राहावा. यासाठी देखील ही मेजवानी दिली जात आहे.
महापालिकेतील सध्या चर्चेत असलेला हा गट आयुक्तांच्या मर्जीतला मानला जातो. त्या अधिकाऱ्याच्या घरपोच ही मेजवानीची खिरापत पोहचवली जात आहे. तो अधिकारी ही आयुक्तांच्या खास मर्जीतला असल्याचं महापालिकेत बोललं जात आहे. यामुळे सध्या या अधिकाऱ्याची महापालिकेत जास्त चलती आहे. या अधिकाऱ्याला खुश ठेवलं म्हणजेच हा अधिकारी आपल्यावर खुश झाला, म्हणजेच आयुक्त आपल्यावर खुश, अशी चर्चा देखील महापालिकेत सुरू आहे. म्हणून या अधिकाऱ्याला गोंजारलं जात आहे. हा गट रोज संध्याकाळी एकत्र ओल्या पार्टीत गुंग असतो. ज्या पार्टीत महापालिकेची म्हणजेच त्यांची रणनीती ठरवतात. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल यासाठी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आयुक्त गंभीर चर्चा करत असतात. मात्र, हा ओल्या पार्टीचा गट या बैठकीत कोरोनाऐवजी एकमेकांना व्हॉट्सअॅपद्वारे संध्याकाळच्या पार्टीतील मेजवानी काय असेल यावरच चर्चा करतात, असंही बोललं जात आहे.
हेही वाचा..मोठी बातमी, शरद पवार घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
आगरी, कोळी पद्धतीच्या या अस्सल चमचमीत मेजवानीमध्ये आरोग्य विभाग अग्रेसर आहे. याच आरोग्य विभागातील दोन डॉक्टर जे स्वतः ला आरोग्य विभागाचे स्वयंघोषित आयुक्त समाजतात, असे हे दोन्ही डॉक्टर वरिष्ठांचा मानपान संभाळत आहेत. ही सर्व चर्चा महापालिकेत जोर धरू लागली आहे. आता कुठे तरी या घटनांकडे महापालिका आयुक्तांनी देखील पाहून थोडी समज देणं गरजेचं आहे. नाही तर एक दिवशी हा गटच आयुक्तांना अडचणीत आणणार असं महापालिकेत बोललं जात आहे.