उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत

  • Share this:

मुंबई, 10 मे : विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसने दोन उमेदवार लढवण्याचा हट्ट केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता तातडीने बैठक बोलावली आहे.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसने तातडीने बैठक बोलावली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे अशोक चव्हाण, नितीन राऊत यांच्यासह काही नेत्यांशी चर्चा करणार आहे. काँग्रेस हायकमांड मात्र, काँग्रेस पक्षाने दुसरी जागा लढवावी, असा आदेश दिला आहे. त्यामुळे  या बैठकीमध्ये चर्चा केल्यानंतर काँग्रेस नेते त्यांची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवणार आहे.

उद्धव ठाकरेंनी केला बाळासाहेब थोरातांना फोन

दरम्यान, काँग्रेस हायकमांडकडून एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पण, त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आणखी एका उमेदवारीचा घोषणा करून गोंधळ निर्माण केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना थोरात यांच्या निवासस्थानी पाठवून निरोपही पाठवला होता. तसंच खुद्द उद्धव ठाकरे यांनीही थोरात यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. पण, तरीही थोरात यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.

'निवडणूक बिनविरोध व्हावी'

विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत. मात्र, तरी देखील काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. आता   उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे काँग्रेसकडून यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेवर उमेदवार कसा निवडून येतो?

विधान परिषद निवडणुकीत जर मतदान घेण्याची वेळ आली तर 1 जागा निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आवश्यक असेल 288/(91) = 28.8 म्हणजेच 29 मते लागणार आहे. म्हणजे, प्रत्येक उमेदवारला 29 आमदारांची मत मिळवणे गरजेच आहे.

हेही वाचा -

त्यामुळे भाजपने चार उमेदवार मैदानात उतरवले आहे आणि संख्याबळ आहे 105. तर महाविकासआघाडीकडे 170 संख्याबळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून 5 उमेदवार लढवण्याचा आग्रह आहे. जेणे करून निवडणूक बिनविरोध होईल. जर महाविकास आघाडीला 6 ते 8 उमेदवार निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज भासणार आहे.

तर भाजपचा सध्याच्या संख्याबळानुसार, 3 उमेदवार सहज निवडून आणता येतात. पण, चौथा उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर त्यांना अपक्षांसह 6 ते ८ मतांची गरज भासणार आहे.  भाजप आपल्याकडे अपक्षासह 112 उमेदवार असल्याचा दावा करत आहे.

पक्षीय बलाबल

भाजप – 105, शिवसेना – 56, राष्ट्रवादी काँग्रेस –54, काँग्रेस – 44, बहुजन विकास आघाडी – 3, समाजवादी पार्टी – 3, एमआयएम – 2, प्रहार जनशक्ती – 2, मनसे – 1, माकप – 1, शेतकरी कामगार पक्ष – 1, स्वाभिमानी पक्ष – 1, राष्ट्रीय समाज पक्ष – 1, जनसुराज्य पक्ष – 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 1 आणि अपक्ष – 13

कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी जाहीर?

तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे कशी वाचवणार खुर्ची, भाजप चौथा उमेदवार कसा निवडून आणणार?

तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना  उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या नावाची घोषणा खुद्द दिल्लीतून करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं आहे.

भाजपकडून कोण आहे मैदानात?

दरम्यान, भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे.  भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 10, 2020, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading