मुंबई, 13 जून : एकीकडे भाजपचे (BJP) नेते महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) कधी पडणार याचे आखाडे बांधत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर वाद होईल आणि सरकार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. पण, 'असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे' असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. तसंच शिवसेनेकडेच पाच वर्ष मुख्यमंत्रिपद राहणार आहे, असं ठामपणे सांगितलं आहे.
'पात्र शेतकऱ्यांना एवढ्यात कर्जमाफीचा लाभ नाही' राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं विधान
'अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे' असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
'देवेंद्र फडणवीस सांगतात, ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्याच वेळी चंद्रकांत पाटील ठामपणे सांगतात, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल. कोणाला कळणार नाही. भाजपचे धोरण स्पष्ट दिसत नाही. सरकारचे काय करायचे ते फडणवीस व पाटील यांनी एकाच टेबलावर बसून काय ते ठरवायला हवे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही हे अमित शहा यांनी एकदा स्पष्ट केले. परिस्थिती अद्यापि तीच आहे' असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.
HBD : जाहिरातीतून मिळाली होती प्रसिद्धी; पाहा दिशा पाटनीचा अभिनय प्रवास
'ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून एखाद् दुसरा आमदार गळास लागेल, पण त्यातून बहुमताचा आकडा जमणार नाही हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी. सरकार बदलाचा एकही पर्याय यशस्वी होण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. त्यात मुख्यमंत्री ठाकरे व दिल्लीतील संवाद वाढला आहे व तो थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी आहे.शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवेच होते. भाजपने शब्द दिला होता तो पाळला नाही. या वेदनेतून शिवसेनेने नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली. आज शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे व स्वतः ‘ठाकरे’ त्या पदावर विराजमान आहेत. राजकारण बदलानंतर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, असा शब्द दिल्लीच्या धावत्या भेटीत पंतप्रधानांकडून मिळाला असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण महाराष्ट्रात भाजपचा झगडाही मुख्यमंत्रिपदासाठीच आहे. बाकी सर्व गोष्टी दुय्यम ठरतात' असंही राऊत म्हणाले.
'महाराष्ट्रातील आघाडी सरकारात समन्वय उत्तम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हस्तक्षेप नाही व मुख्यमंत्री स्वतंत्रपणे काम करीत आहेत. या व्यवस्थेस नख लागेल असे काहीच घडणार नाही. महाराष्ट्रातील सरकार चालविणे व टिकवणे ही आघाडीतील तिन्ही पक्षांची गरज आहे. मजबुरी हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही. केंद्रासह अनेक राज्यांत भाजपचे शासन आहे, पण महाराष्ट्रासारखे राज्य हाती नसेल तर इतर मोठी राज्ये हाती असूनही जीव रमत नाही. काँग्रेसकडे एखाद्-दुसरे राज्य आहे, पण महाराष्ट्राच्या सत्तेतील सहभाग सगळ्य़ात महत्त्वाचा. राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महाराष्ट्राबाहेर विस्तारली नाही व हिंदुत्ववादाचा सगळ्य़ात मोठा ‘ब्रॅण्ड’ ठरूनही शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मोठी झेप घेता आली नाही. अशा वेळी महाराष्ट्राची सत्ता टिकवणे हे तीनही पक्षांना आवश्यक आहे' असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.