मुंबई, 27 सप्टेंबर : संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थितीत होते. तिन्ही पक्षांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली होती.
उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. पण कालच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे.
काल या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपात जवळीक निर्माण होतेय का याची चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीस आणि राऊत या दोघांची भेट फक्त दैनिक सामनात फडणवीसांच्या मुलाखतीबद्दल होती, असं स्पष्टीकरण दिले आहे. मात्रस गेल्या वर्षी झालेल्या अनाकलनीय राजकीय उलथापालथींमुळे प्रत्येक राजकीय हालचाल संशयाच्या नजरेनं पाहिल्या जात आहे. आणि आज लगेच पवार- ठाकरे भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कालच्या भेटीमुळे अस्वस्थता आहे की काय याची चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले राऊत?
त्याआधी आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीबद्दल खुलासा केला होता. यावेळी ते म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो' असं राऊत म्हणाले.
सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही - फडणवीस
दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. 'संजय राऊत यांच्या भेटीमुळे शिवसेनेसोबत अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही' असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
तसंच, 'महाविकास आघाडी सरकारचे जे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू. पण सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.