मुंबई, 01 मार्च : कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण सुरू आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत कोरोनाची लस घेतली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.
राज्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस देण्याची मोहिम आजपासून सुरू झाली आहे. शरद पवार आज दुपारी 1.30 च्या सुमारास मुंबईतील जेजे रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी दुसऱ्या टप्यातील लसीकरण कार्यक्रमांतर्गत लस घेतली.
शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस pic.twitter.com/Frvx2BX6NO
— News18Lokmat (@News18lokmat) March 1, 2021
'शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी सिरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर त्यांना 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल. त्यांची प्रकृती पुर्णपणे ठीक आहे', अशी माहिती वैद्यकीय संचालक, डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
विशेष म्हणजे, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्दचेरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोनाची लस दिली आहे.
2 मुख्यमंत्र्यांनीही घेतली कोरोना लस
तर दुसरीकडे, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik)यांनीही लस घेतली आहे. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीदेखील कोरोनाची लस टोचून घेतली.
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाला आजपासून सुरुवात
60वर्षांपुढच्या नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा 45 च्या पुढच्या नागरिकांनाही या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठीचं रजिस्ट्रेशन CoWin पोर्टलवर सुरू झालं आहे.
या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.