• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ठाण्यात 3 दिवसांपासून पावसाचा कहर, तलावाचं पाणी रस्त्यावर; उल्हासनगरात कोसळला 400 मिमी पाऊस

ठाण्यात 3 दिवसांपासून पावसाचा कहर, तलावाचं पाणी रस्त्यावर; उल्हासनगरात कोसळला 400 मिमी पाऊस

Rainfall in Thane: मागील तीन दिवसांपासून ठाण्यात पावसानं कहर केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे. पावसाचं पाणी शहरातील बाजारपेठांत शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

 • Share this:
  ठाणे, 19 जुलै: मागील तीन दिवसांपासून ठाण्यात (Thane) पावसानं कहर (Heavy rainfall) केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे. यामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव (Masunda Lake) देखील ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पुरजन्य परिस्थिती आली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहेत. याशिवाय हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली आहे. तसेच ठाणे शहराला लागून असलेला शिळ डायघर महामार्गदेखील पाण्याखाली गेला आहे. मागील तीन दिवसांपासून हा महामार्ग पाण्याखाली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पण मार्ग बदलल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. हेही वाचा-धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेचा थरारक VIDEO त्याचबरोबर, दिवा शिळ चौक ते मुंब्रा खान कम्पाउंडपर्यंत संपूर्ण महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मागील बऱ्याच काळापासून याठिकाणी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अजूनही ठाणे शहरात पावसाचा जोर वाढत असून असाच पाऊस सुरू राहिल्यास 26 जुलै 2005 सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंब्रा शहराच्या रहिवाशी भागातही पावसाच्या पाण्याच प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही वाढत आहे. हेही वाचा-भरपावसात बजावलं कर्तव्य; जखमी बापलेकीला मुंबई पोलिसानं सुरक्षित स्थळी हलवलं भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासांत ठाणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकट्या उल्हासनगर परिसरात तब्बल 400 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ शहापूर 200 मिमी, कल्याण-180 मिमी, भिवंडी- 155 मिमी आणि मुरबाड याठिकाणी 56 मिमी पाऊस कोसळला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: