मुंबई/अहमदनगर, 27 मे: लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 30 मे रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि काही मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी घडू शकतात. यातील सर्वात महत्त्वाची घडामोड असेल ती काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करु शकतील. विखे-पाटील यांच्यासोबत काही आमदार देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात त्यांच्यासोबत कोणते आमदार भाजपमध्ये जाणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी नगरमधून विजय देखील मिळवला. सुजय यांच्या प्रवेशापासून राधाकृष्ण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती. निवडणुकीच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर नगर आणि शिर्डीची जबाबदारी दिली होती. या दोन्ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. विखेंनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळल्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश करुन त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.
राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना मंत्रिपद देखील तितक्याच तोला मोलाचे दिले जाईल, असे बोलले जाते. विखेंसोबत राज्यातील 12 आमदार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुजय विखे-पाटील यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना लवकरच राधाकृष्ण यांना भाजपमध्ये आणणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळेच आता राज्याच्या राजकारणातील ही मोठी घडामोड नेमकी कोणत्या दिवशी होते याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
VIDEO: 'रामराजे हे बिनलग्नाची औलाद', भाजपच्या नवनिर्वाचित खासदाराची खालच्या पातळीवर टीका