अखेर १२ दिवसांनंतर सुभाष देशमुख मराठा आंदोलकांच्या भेटीला!

अखेर १२ दिवसांनंतर सुभाष देशमुख मराठा आंदोलकांच्या भेटीला!

आज उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकाच वेळी हजर झाले.

  • Share this:

सागर कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 13 नोव्हेंबर : आझाद मैदानावर सकल मराठा क्रांती मोर्चाचं बेमुदत उपोषण सुरू आहे. अखेर आज १२ दिवसांनंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. सुभाष देशमुख उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर काही वेळानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे हेही पोहोचले होते.

मुंबईत आझाद मैदान येथे गेल्या १२ दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज माजी मुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे उपोषणकर्त्यांची भेट घेणार होते. परंतु, अजित पवार आणि धनंजय मुंडे येण्याआधीच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले.

नेमकं सुभाष देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला आधी आल्याने पवार आणि मुंडे याची कोंडी झाली. त्यांना काहीवेळ ताटकळत उभे राहावे लागले, त्यानंतर आझाद मैदान येथील इतर काही आंदोलनकर्त्यांनी अजित पवार भेट घेत होते. सुभाष देशमुख हे उपोषकर्त्यांपासून उठत नाही हे पाहून अखेर अजित पवार आणि धनंजय मुंडे देशमुख यांच्या जवळच जावून बैठक मारली.

९ आॅगस्ट रोजी मराठा समाजाला राज्य सरकारने जी काही आश्वासनं दिली होती ती सगळी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.मराठा आरक्षणाचा अहवाल या महिन्यात येणार आहे त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सुभाष देशमुख यांनी दिली.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारने फक्त घोषणा केली. कृती मात्र काहीच केली नाही. सुभाष देशमुख आंदोलकांना भेटले पण ठोस काहीच निर्णय घेतला नाही अशी टीका अजित पवार यांनी केली. तसंच सकल मराठा समाज आंदोलनासंदर्भात येत्या अधिवेशनात पहिल्या दिवसापासून आक्रमक राहू आणि विरोधक सगळे एकत्रित येईल असा दावाही पवार यांनी केला.

================

First published: November 13, 2018, 5:29 PM IST

ताज्या बातम्या