मुंबई 03 ऑक्टोंबर : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीतून कोण लढत देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाच आता आघाडीच्या उमेदवाराचं नाव निश्चित झालंय. सुरेश माने यांना आघाडीतर्फे उमेदवारी दिली जाणं हे निश्चित मानलं जातंय. वरळीत राष्ट्रवादीने सुरेश माने यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांना AB फॉर्म दिला. ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत. मनसेने याआधीच वरळीतून उमेदवार देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी तिथे उमेदवार देणार आहे. त्यामुळे ही लढत एकतर्फी होणार नाही याची काळजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलीय. सुरेश माने हे बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. नंतर त्यांनी बहुजन सोशलिस्ट रिपब्लीकन पार्टी हा गट स्थापन केला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत या गटाचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांचं पारडं निश्चितच जड असलं तरी त्यांना लढत सोपी करायची नाही असे विरोधी पक्षांचे डावपेच आहेत. त्यामुळे माने यांच्या नावावर एकमत करण्यात आलं. सचिन अहीर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या कायकर्त्यांचा मोठा गट पक्ष सोडून गेला नाही. त्या गटाने ही निवडणूक लढवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे केली होती. आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. स्थानिक राजकारण आणि मतांची गणित याचा विचार करून सुरेश माने पुढे आलं.
वरळीत दलित आणि बहुजन मतांची टक्केवारीही मोठी असल्याने त्याचा फायदा होण्याची शक्यता काँग्रस- राष्ट्रवादीला वाटते. त्यातच माने हे राष्ट्रवादीच्या 'घड्याळ' या चिन्हावर लढण्यास तयार आहेत. या लढतीमुळे आदित्य यांना सोपी जाणार नाही असा संदेश काँग्रेस-राष्ट्रवादीने दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा