आदित्य ठाकरेंचा शिवसेनेच्या कार्यकारिणीत समावेश होण्याची शक्यता

आदित्य ठाकरेंचा शिवसेनेच्या कार्यकारिणीत समावेश होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेचा पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वच मान्यताप्राप्त पक्षांना दर पाच वर्षांनी पक्षांतर्गत निवडणूक घेणं बंधनकारक आहे.

  • Share this:

22 डिसेंबर:  शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांची बिनविरोध फेरनिवड केली जाणार आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या तसंच ठाण्याचा गड राखणाऱ्या सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात शिवसेनेच्या कार्यकारिणीत  नेतेपदाची मिळण्याची शक्यता आहे अशी  सेनेच्या सूत्रांची माहिती आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेचा पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वच मान्यताप्राप्त पक्षांना दर पाच वर्षांनी पक्षांतर्गत निवडणूक घेणं बंधनकारक आहे. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख तसेच नऊ नेते आणि ३१ उपनेत्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजे २३ जानेवारी रोजी षण्मुखानंद सभागृहात हा निवडणूक कार्यक्रम पार पडणार असून या निवडणूक कार्यक्रमासाठी अ‍ॅडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी २३ जानेवारी २०१३ रोजी शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणूक होत असल्याचे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

५ ते १० जानेवारी या काळात निवडणुकीसाठी नामांकनपत्रे दिली व स्वीकारली जाणार आहेत. ११ जानेवारी रोजी नामांकनपत्रांची छाननी होणार असून १३ जानेवारी रोजी दुपारी तीन पर्यंत नामांकनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. यानंतर २३ जानेवारी रोजी दुपारी ११ ते २ या कालावधित मतदान होणार असून तीन वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. शिवसेनेच्या प्रथेचा विचार करता जेवढे नेते व उपनेते आहेत तेवढीच नामांकनपत्रे भरली जातील. त्यामुळे ज्या काही नियुक्त्या होतील त्या बिनविरोधच असतील असे सेनेच्या सूत्रांनी सांगितलय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 10:15 AM IST

ताज्या बातम्या