Home /News /mumbai /

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'ईडीने नोटीस बजावणे हे आता नवीन राहिले नाही. हे सर्व राजकीय आहे आणि हे सर्व आम्हाला माहिती आहे'

    मुंबई, 28 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivena Mp sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha raut) यांना सक्तवसुली संचालनालय (ED)ईडीने नोटीस बजावली आहे. लवकरच त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी ईडीच्या चौकशीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी वर्षा राऊत यांना ईडीने बजावलेल्या नोटीसीवरून परखड मत व्यक्त केले आहे. 'ईडीने नोटीस बजावणे हे आता नवीन राहिले नाही. हे सर्व राजकीय आहे आणि हे सर्व आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला या गोष्टींची भीती वाटत नाही', अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. तसंच, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र मिळून स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत हीच सर्वात मोठी बाजू आहे. आम्ही पूर्ण ताकदीने महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काम करत आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. काय आहे प्रकरण? PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती.  गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते.  प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.  प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच  हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेबरला चौकशीसाठी बोलावले आहे. काय म्हणाले संजय राऊत? 'ईडीने बजावलेली कोणतीही नोटीस मला अजून मिळालेली नाही. भाजपचे नेतेच ईडीच्या नोटिसीबद्दल बोलत आहे. त्यामुळे मी माझा माणूस हा ईडी कार्यालयात पाठवला आहे. कदाचित नोटीस ही कार्यालयात अडकली असेल. त्यांचा माणूस आता नोटीस घेऊन निघाला असेल' असं राऊत म्हणाले. 'हे राजकारण आहे. त्यांना काय राजकारण करायचे आहे, ते करू द्या. मी नोटीस शोधत आहे आहे. कदाचित भाजप कार्यालयातून निघाली असेल. पण या प्रकरणावर दुपारी शिवसेना भवनात सविस्तर बोलणार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या