Home /News /mumbai /

आदित्य ठाकरेंना मिळाली मंत्रालयात खास केबिन!

आदित्य ठाकरेंना मिळाली मंत्रालयात खास केबिन!

महाविकासआघाडीचा विस्तार झाल्यानंतर मंत्रालयामध्ये सर्व मंत्र्यांसाठी लवकरच केबिनचे वाटप होणार आहे.

    सागर कुलकर्णी, प्रतिनिधी मुंबई, 01 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे कॅबिनेटमंत्रिपदावर विराजमान झाले आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्यासाठी मंत्रालयामध्ये खास केबिन देण्यात आली आहे. महाविकासआघाडीचा विस्तार झाल्यानंतर मंत्रालयामध्ये सर्व मंत्र्यांसाठी लवकरच केबिनचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी आज मंत्रालयामध्ये केबिनची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील 717 केबिन असणार आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांचे अजूनही खातेवाटप जाहीर झालं नाही. त्यामुळे केबिन वाटप ही झालेलं नाही. पण आदित्य ठाकरे यांच्यासाठी एक केबिन मात्र खास राखीव ठेवण्यात आली आहे. या  केबिनवर आदित्य ठाकरे यांचं नाव देखील लिहिले आहे. आज या केबिनची पाहणी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण मुख्यमंत्री कार्यालयासोबत केली. त्यावेळेस आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मंत्रालयातील एका दालनाबद्दलच्या अफवेमुळं मंत्र्यांना भीती दरम्यान, सध्या मंत्रालयातील एका नको असलेल्या दालनाची चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्व मंत्र्यांना दालन देण्याचं काम सुरू झालं आहे. यामध्ये 602 नंबरच्या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे. यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती आहे. 602 नंबरच्या या दालनाबद्दल एक समज पसरला आहे. तो म्हणजे इथं जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही. मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर असलेलं हे दालन अद्याप कोणाला देण्यात आलेलं नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यलयीन कर्मचाऱ्यासाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. सुरुवातीला या दालनात मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं. याआधीच्या भाजप सरकारमध्ये हे दालन एकनाथ खडसे यांना मिळाले होते. ते कृषी, महसूल आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाचं कामकाज बघायचे. पण खडसे यांना 2 वर्षातच राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे कार्यालय दिलं गेलं. त्यांचा दोन वर्षांनी हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर हे दालन कोणालाही देण्यात आलं नाही. 2019 मध्ये भाजपचे अनिल बोंडे यांच्याकडे कृषीमंत्रिपद देण्यात आलं. तेव्हा हेच दालन बोंडेना दिले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेत बोंडेंचा पराभव झाला. यानंतर 602 नंबरच्या दालनाबाबतचा समज आणखी वेगाने पसरला. महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनीही याआधी 602 क्रमांकाच्या दालनात बसून काम केलं आहे. त्यांनीसुद्धा इथं काम करण्यास नकार दिला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दालनाबद्दलच्या अफवा फेटाळल्या आहेत. सर्व मंत्र्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार दालने दिली जात असून लवकरच हे दालनही एखाद्या मंत्र्याला दिलं जाईल असं प्रशासनाने म्हटलं आहे. खातेवाटपाचा अजूनही निर्णय नाही दरम्यान, आज दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेत्यामध्ये खातेवाटप बाबत खलबतं सुरूच होती. पण अजूनही अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर नाही. सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवनियुक्त मंत्री अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांची पहिल्यांदा सकाळी दहा वाजता स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे बहुतेक सर्व नेते तसंच आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर न उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्वजण पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत खातेवाटप चर्चा केली. या बैठकीत कालांतराने उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सहभागी झाले. बैठकीनंतर बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपात पक्षात कोणताही मतभेद नाही. खातेवाटप आणि शासकीय बंगला वाटप लवकर केले जाईल, असं सांगितलं. रात्री उशिरापर्यंत अधिकृतरित्या मुख्यमंत्री कार्यालय खातेवाटप जाहीर करेल का याची चर्चा मात्र दिवसभर प्रशासकीय पातळीवर राहिली. महाविकासआघाडीचे नेते खातेवाटपाचा तिढा सुटल्याचा दावा करत असतानाच उशिरापर्यंत खातेवाटप जाहीर झालेले नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Aditya thackeray, Mantralaya, Mumbai, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या