सोनू सूद यांनी घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट, संजय राऊतांशी सामन्यानंतर अखेर समेट!

सोनू सूद यांनी घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट, संजय राऊतांशी सामन्यानंतर अखेर समेट!

लॉकडाऊच्या काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या शिताफीने आणि झपाट्याने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकतं? अशी टीका सामनामधून करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई 7 जून:  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद यांनी थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रात्री साडे दहाच्या सुमारास ही भेट झाली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सोनू सूद यांना घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबत होते. सोनू सूद यांनी विस्थापित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी खूप मदत केली होती. त्याच मदतीवरून संजय राऊत आणि काही शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजप हा सोनू सूदचा बोलविता धनी आहे असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत सोनू सूदने त्यांना तो करत असलेल्या कामाची माहिती दिली. संजय राऊत आणि सोनू सूद यांचा जोरदार सामना रंगला होता. त्यानंतर आज समेट झाल्याचं बोललं जातं. या भेटीपूर्वी सोनू सूद यांनी मराठीतून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं. असं त्यांनी म्हटलं होतं.

तर अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला असा टोला संजय राऊतांनी हाणला होता.

संजय राऊतांनी केली होती टीका

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सोनू सूदनं केलेल्या मदतीला राजकारणाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच काही राजकीय शक्तींनी लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदचा प्याद्याप्रमाणे वापर तर केला नाही ना? असा रोखठोक सवाल 'सामना'तून संजय राऊत यांनी केला होता.

Unlock 1: महाराष्ट्रात उद्या मंदिरं आणि मॉल्स उघडणार का? बाहेर पडण्यापूर्वी वाचा

लॉकडाऊच्या काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या शिताफीने आणि झपाट्याने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकतं? सूद याने म्हणे लाखो मजुरांना परराज्यात त्यांच्या घरी पोहचवलं. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीचं केले नाही का? असा मार्मिक सवाल सामनातून करण्यात आला आहे. सोनू सूदच्या निमित्तानं आता राजकीय कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा...कोरोनाबाधित 82 वर्षांची आजी हॉस्पिटलमधून गायब; प्रशासनाची वाढली डोकेदुखी

राज्यात कोरोनाच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीपासूनचं संघर्ष पेटला असताना आता त्यात या नव्या वादाची भर पडली आहे. त्यामुळं आगामी काळात या मुद्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published: June 7, 2020, 10:55 PM IST

ताज्या बातम्या