मुंबई, 21 मार्च : ठाणे महापालिकेचे वादग्रस्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा कार्यभार काढल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली आहे. आहेर यांच्याविरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्यापासून धोका असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आहेर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फतही स्वतंत्र चौकशी करण्यात येत होती. अखेर आहेर यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
सभागृहात काय झालं?
मंत्री उदय सामंत : या प्रकरणी उपमुख्यमंत्री यांनी सिआयडी चौकशीची मागणी केली आहे.
अनिल परब : महेश आहेर हा माणूस दोन वेळा निलंबित आहे. तरी याला चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळते. या माणसाला आमच्यापेक्षा जास्त बॉडीगार्ड आहे. एका क्लिपमध्ये मी टाईट होऊन सीएमला फोन लागला. सीएमने ते काम करून टाकतो म्हणाले. हे सिद्ध झालेले गुन्हे आहे. SIT चौकशी त्यांच्या गैरव्यवहाराबाबत होईल. तो इतके वर्ष ठाण्यातच त्याची एकाच जागी नियुक्ती कशी? हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांशी संबधित आहे. याला आपण तात्काळ निलंबित करणार का? गुन्हे सिद्ध झाल्यास काय कारवाई करणार?
उदय सामंत : सदनिका प्रकरणात अहवाल सादर झाला. त्यात ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाराचा सहभाग नसल्याचे समोर आले आहे.
अनिल परब : महोदय पण उत्तरात समोर आलयं, सरकार म्हणतयं उत्तरात भ्रष्टाचार झालाय. त्याच्या हातात कारभार आहे. आणि गैरव्यवहार झाला त्यात त्याचं नाव नाही? म्हणजे तोच गैरव्यवहार करणार आणि तोच चौकशी करणार?
उदय सामंत : संबधित अधिकाऱ्याचे ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्यात जे काही आरोप आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे.
अनिल परब : जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणारा ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी हा 10 वी पास आहे. मग हा अधिकारी झालाच कसा. 70 हजार पगार असणारा व्यक्ती बॉडीगार्ड कसा काय घेऊन फिरतो. तोच व्यक्ती म्हणतो की मी दारू पिऊन सीएमला फोन लावला होता. या प्रकरणाची चौकशी करा. ज्याची चौकशी करायची आहे तो अजुन पदावर कसा काय आहे. याला ताबडतोब निलंबित करणार आहात का? ज्या अधिकाऱ्यावर आरोप होत आहेत. तो 10-10 बॉडीगार्ड घेऊन फिरत आहे. याच्याकडे पैसा आला कुठून. याला निलंबित करा.
उदय सामंत : सहायक आयुक्त यांनी कुठंही चुकीचं केलं आहे, अस मी म्हणालो नाही.
निलम गोऱ्हे : सीआयडी चौकशी सुरू आहे, असं आपण म्हणतात. परंतु, सदनिका वाटपात महापालिका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार दिसत आहे. या व्यक्तीवर आरोप स्पष्ट होतं आहे.
उदय सामंत : ठाण्याचे व्यक्ती आहे म्हणुन इतरांना गोवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे.
वाचा - उद्धव ठाकरेंनंतर निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या घड्याळाबाबत मोठा निर्णय!
शशिकांत शिंदे : मुख्यमंत्र्यांच नावं घेऊन जर कोणी बोलत असेल तर चौकशी व्हायला हवी ना. एक अधिकारी म्हणतो की मी रात्री दारू पियुन मुख्यमंत्र्यांना फोन करतो. याची चौकशी व्हायला हवं. आम्ही मागणी केली आहे की त्याच्या शिक्षणाची चौकशी करा. कारण ते शिक्षणं बोगस आहे. 500 सदनिका या व्यक्तीने विकल्या आहेत आणि तरी तुम्ही त्याला वाचवत आहात.
उदय सामंत : या प्रकरणाची चौकशी 30 दिवसात पुर्ण करुन योग्य ती कारवाई केली जाईल.
एकनाथ खडसे : त्या. अधिकाऱ्याला मुख्यमंत्री कार्यालय पाठीशी घालत आहे. सभापतींनी मार्गदर्शन करुनही मुख्यमंत्री किंवा सरकार यांवर कठोर कारवाई करत नाही. मुख्यमंत्री आणि त्या अधिकाऱ्याचे थेट संबंध आहेत असा माझा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी येऊन याचा खुलासा करावा.
उदय सामंत : विरोधक हे प्रकरण जाणीवपुर्वक मुख्यमंत्र्यांशी जोडत आहेत. शासन योग्य ती कारवाई करणार आहे. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी येवून निवेदन करण्याची गरज नाही.
अनिल परब : त्या अघिकाऱ्याला निलंबित करायचे नाही, असे आदेश नसतील तर निदान त्याला पदावरुन बाजूला तरी करा. यात काही तरी आहे, याचा संशय हे लोकच करुन देत आहे.
उदय सामंत : माझ्यावर कोणताही दबाव नाही. ठाणे मनपा अधिकारी महेश आहेर यांचा कार्यभार काढल्याची घोषणा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jitendra awhad, Thane