ठाणे, 04 ऑक्टोबर : ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला उपचारासाठी ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांच्या मदतीनं वाहतूक पूर्ववत करण्यात यश आलं आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवर पुलावरून जाणाऱ्या एका ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक पुलाच्या कठड्यावर आदळला. जाड पुठ्ठ्यांनी भरलेल्या या ट्रकचा पुलावर भीषण अपघात झाल्यानंतर पुलावरून पुठ्ठे खाली कोसळले. पुलाखालून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या कारवर हे पुठ्ठे कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. पुठ्ठांचं वजन आणि पुठ्ठे पडण्याचा वेग जास्त असल्यामुळे कारचा चुरा झाला आहे. या कारमध्ये दोन जण होते त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
या विचित्र अपघाताची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी कारवरील पुठ्ठे आणि ट्रक हटवला आणि खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. हा अपघात शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वागबिळ उड्डाणपुलावरून जाणाऱ्या ट्रकमुळे झाला आहे.