मुंबई, 25 जून : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज मुंबईत एका कार्यक्रमात युवासेना प्रमुखाच्या भूमिकेत दिसले. गेल्या अडीच वर्षांपासून पर्यावरण मंत्री म्हणून शांत आणि संयमाने वावरणारे आदित्य ठाकरे आज प्रचंड आक्रमक भूमिकेत दिसले. त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. बंडखोर आमदारांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईतच यावं लागेल. विधानसभेला जाणारा रस्ता हा वरळीतूनच जातो, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
'त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येणं नाही'
"हिंमत असेल तर राजीनामा पाठवा आणि निवडणुकीला सामोरे जा. आम्ही तयार आहोत. मला माहिती आहे इथे जे उभे आहेत ते आज प्रचाराला त्यांना बाहेर पडू देणार नाहीत. तिथे काही आमदार बसले आहेत जे आपल्या संपर्कात आहेत. त्यांना आपण परत घेऊ शकतो. ज्यांनी बंड केलाय, दगा दिलाय त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येणं नाही, हे आपण शपथ घेऊन पुढे चाललं पाहिजे", असा एल्गार आदित्य ठाकरेंनी केला.
"फ्लोर टेस्टट तर होणारच आहे. ज्या दिवशी फ्लोर टेस्ट होईल त्यादिवशी मुंबईत उतरतील. विमानतळावरुन विधानभवनात जाण्याचे रस्ते आपल्या वरळीतून आहेत. वरळी नाहीतर आपल्या परळमधून आहेत. येणार आमच्या वांद्र्यामधून. ही मुंबई आपली आहे. ती दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. कदाचित त्या फ्लोर टेस्टसाठी केंद्र सरकार आर्मी लावू शकतील", असं आदित्या ठाकरे म्हणाले.
"एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. हैराण देखील होतो. पण ठिक आहे, राजकारण म्हटल्यानंतर लोकं कशी बदलू शकतात हे आपण अनेक वर्ष बघितलं आहे. पण हाच प्रश्न सतावतो की आपण या लोकांना कधी कमी केलं आणि काय कमी दिलं? कित्येक लोकांवर अन्याय झाला. हे आता दिसून येतंय. कालपण कल्याण-डोबिंवलीवरुन कार्यकर्ते आले की त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही. मातोश्रीवर आल्यावर त्यांचे फोन यायचे की तुम्ही तिथे का गेले म्हणून. हे आम्ही दुर्लक्ष केलं", असं आदित्य म्हणाले.
'शिवसेनेसमोर लढण्याची हिंमत आहे का?'
"जे चाललं आहे ते लोकशाहीला पकडून आहे का? जे बंड करुन गेले त्यांना मंत्रीपदं, चांगली पदं दिली होती. जी खातं मुख्यमंत्र्यांकडे असतात ती खातं मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले. ते रात्री बारा वाजता पळाले. ते ज्या गुवाहाटीमध्ये जात आहेत तिथे दोन चित्र आहेत. एक अंदामानचं आहे. कैदी आहेत. काही 15-16 संपर्कात आहेत. आसाममध्ये पूर परिस्थिती आहे. मी त्या राज्याचा मुख्यमंत्री असतो तर तिथे मी सांगितलं असतं आधी मला मदत करा. लाखो लोकं संकटात आहेत, लोकांचा जीव जातोय. तिथे हे सगळं सुरु आहे. आमदारांनी कसं वागायला पाहिजे. आधी जे बंड झाले आहेत ते विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जायला झाले होते. आता यांना दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात जा, नाहीतर भाजपात. त्यांच्यात शिवसेनेसमोर लढण्याची हिंमत आहे का?", असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
'त्यांना समजावण्याची जबाबादारी महिला आघाडीने घेतलीय'
"मी सकाळी महिला आघाडीशी बोललो. पुढच्यावेळेपासून जास्तीत जास्त आमदार या महिला असायला पाहिजेत, असं मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. मला आज महिला आघाडीने सोप्या भाषेत सांगितलं आहे की, त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची शिवसेना हवी आहे. बाळासाहेबांनी किंवा दिघे साहेबांनी समजावलं असतं तसं समजवण्याची जबाबदारी ही महिला आघाडीने घेतली आहे", असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.
(घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार : आदित्य ठाकरे)
"आपण एकच गोष्ट ठरवली पाहिजे. हे दगाफटका खूप झालं. जे आपल्यातले फुटीरवादी आहेत त्यांना कसं कैद्यांसारखं वागवलं जातंय ते पाहिलं पाहिजे. असं राजकारणात व्हायला लागलं, तर आपण काय करायला पाहिजे. लोकशाही आपल्या देशात राहिलीय की नाझीवाद फोफावला आहे?", असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
"मागचा बंड आपण संपवला आहे. आपल्यासमोर जे आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना न घाबरता महाराष्ट्रातून पळवून लावायचं आहे. आपण जिंकणारच आहोत", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.