मुंबई 31 ऑक्टोंबर : राज्यात सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला असताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. सत्तेतल्या वाटणीवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आणि मान-अपमानाचं नाट्य सुरू आहे. निकाल लागून सहा दिवस झालेत तरी अजुन राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. दोन्ही पक्षांमधले मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. ही सगळी पार्श्वभूमी असताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेणं राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलं आहे. ही भेट राज्यातल्या ओळा दुष्काळाविषयी असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जातंय मात्र या भेटीला राजकीय किनार असून हा दबावाचा भाग असल्याचीही चर्चा आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्यपालांनी लक्ष घालावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. राज्यापालांनीही लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय. सरकारं बनतील आणि बिघडतील पण शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.
चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!
शिवसेनेच्या गटनेपदावर आज एकनाथ शिंदे यांची निवड झाली. त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली. असं असतानाच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेणं याला महत्त्व प्राप्त झालंय. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी शिवसेनेनं राज्यपालांकडे केलीय.
राष्ट्रवादीही राज्यपालांची भेट घेणार
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमच्या आघाडीची मागणी राहणार असून त्यासाठी एक - दोन दिवसात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याशिवाय राज्यात कारखानदारी बंद होवून बेरोजगारी वाढत आहे. या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आणि त्यावर काय उपाय योजना करता येईल याबाबत आघाडीच्यावतीने राज्यपालांची भेट मागण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.