मुंबई, 26 जून : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आजदेखील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच जे बंडखोर आमदार गुवाहाटीत गेले आहेत ते तिथे कैद झाले आहेत, असा दावा आदित्य यांनी केला. गुवाहाटी येथील हॉटेलच्या बाथरुमध्ये प्रत्येकी पाच पोलीस लावले आहेत. आमदारांवर करडी नजर ठेवली जात आहे. काही आमदारांना तर मान आणि हात पकडून फरफटत नेलं. त्यांना बोलू दिलं गेलं नाही, असा धक्कादायक दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमदारांना शिवसेनेत सन्मान होता. पण गुवाहाटीत गेलेल्या आमदारांना लाचारी पत्कारावी लागल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"आपली जबाबादी दुप्पट झाली आहे. आपले निष्ठावान शिवसैनिक आपल्यासोबत राहिलेले आहेत. त्यांना ताकद देणं, त्यांच्यासोबत राहणं, खांद्याला खांद्या लावून उभं राहू. कारण समोरुन येणारे हे केंद्र सरकारने पाठबळ दिलेले चिरकूट येणार आहेत. कसं असतं डास जेव्हा येतात तेव्हा कळत नाही की ते खिडकीतून, दारातून किंवा कुठून येतात. त्यामुळे आपल्याला गुडनाईट लावायचं आहे. कारण हिंमत असती, हे वाघ असते तर पळून गेले नसते", अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
(एकनाथ शिंदेंचा गेम त्यांच्यावर उलटणार? कायदेशीर बाबींमुळे आमदारकी धोक्यात)
"मी आजपण चॅलेंज देतोय, ज्यांना पळत यायचंय त्यांनी या. दहा-बारा फुटीर आहेत. पण त्यातील 15-16 हे अजूनही त्रासलेले आहेत. ते किडनॅप झाल्यासारखे आहेत. त्यांना वाटलं होतं की ते एकदम शानमध्ये थाटात जातील, असं वाटलं होतं. आपण इथे त्यांना वागणूक द्यायचो, सगळेजण पाया पडायचे, भेटायचे. पण तिथे तसं नाही चालत. ते तिथे गेल्यानंतर कैदी झाले. जे इथून जात आहेत ते कैदी झालेत. त्यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्या व्हिडीओत याच मोठ्या नेत्यांना दोन्ही हात पकडून, मान पकडून फरफटत नेत आहेत. त्यांना बोलायला देखील नेत नाहीयत. प्रत्येक बाथरुममध्ये पाच पोलीसवाले लावलेले आहेत. सीआरपीएफची सुरक्षा लावलेली आहे", असं आदित्य म्हणाले. "हे खरंय. तुम्ही विचारुन बघा. जाऊद्या विचारु नका, नाहीतर तुम्हालाही खेचतील", अशी मिश्किल टीका त्यांनी यावेळी केली.
"अशी हालत झालेले नेते तिथे गेले आहेत. प्रकाश सुर्वे सारखी व्यक्ती जाऊ शकते यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. ती व्यक्ती परवा माझ्यासोबत होती. धक्काबुक्की करायला जे समोरुन चालत येत होते त्यांना धडललं आणि मला सांगितलं की, साहेब काहीह होऊ दे, मी तुमच्यासोबत राहीन. दिलीप लांडे, ते माझ्या ऑफिसमध्ये असायची", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.