पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्यानं मुंबईत तरुणानं केलं धक्कादायक कृत्य

पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्यानं मुंबईत तरुणानं केलं धक्कादायक कृत्य

गावाकडून आलेल्या विजयला मुंबईत येवून पोलीस व्हायचं होतं. त्याकरता तो पोलीस भरतीची तयारीही करत होता.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : स्वप्न नगरी मुंबईत जाऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण रोज या शहरात येतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात, मात्र काहींची धुळीस मिळतात. निराशेने काहीजण मुंबई सोडून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी निघून जातात पण काही असे आहेत ज्यांना मुंबईतच राहायचं असल्याने ते काहीही करतात आणि वाटेल ते काम करुन मुंबईतच राहतात.

विजय घुंडरे या तरुणासोबत असचं काहीसं घडलं आहे. गावाकडून आलेल्या विजयला मुंबईत येवून पोलीस व्हायचं होतं. त्याकरता तो पोलीस भरतीची तयारीही करत होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो पोलिसात भरती होवू शकला नाही. हे त्याच्या मनाला इतकं लागलं की “भरती झालो नाही म्हणून काय झालं, मी पोलीसच आहे” असं म्हणत तो अक्षरश: पोलीस असल्यासारखाच वागू लागला.

त्याकरता त्याने पाहिले की मुंबई पोलिसांचे जवान किती प्रकारचे गणवेश घालतात ते सर्व गणवेश विजय घालायचा. एवढचं नाही तर पोट भरण्यासाठी विजय जी गाडी चालवायचा त्या गाडीवरही त्याने पोलीस अशी पाटी लावली होती. कधी कधी तर तो थेट मुंबई पोलिसांच्या गणवेशात गाडी चालवायचा. एवढंच नाही तर विजयने सोशल मीडियावर vijay_mumbaipolice हा आयडी बनवला आहे.

हे पाहून गाडीत बसलेले प्रवासी विजयशी आदराने बोलायचे तर अनेकदा पोलिसांनी विजयच्या गाडीवर पोलीस पाटी पाहून विजयच्या गाडीवर कारवाई देखील केली नाही. पोलीस गणवेशामुळे मिळत असलेला मान आणि फायदा विजयला इतका हवा हवासा वाटू लागला की तो आता याचा गैरफायदा घेवू लागला होता. त्याने मुंबई पोलीस असल्याचे भासवून गाडी घ्यायची आहे म्हणून त्याने सैन्यदलाच्या अधिकार्‍याकडून 50 हजार आणि मुंबई पोलीस दलाच्या अधिकार्‍याकडून 20 हजार रुपये घेतले. अशा प्रकारे त्याने सरकारी अधिकाऱ्यांचीच फसवणूक करण्याचा तोतया पोलिसगिरीचा धंदा सुरु केला. पण जास्त दिवस त्याचा हा धंदा चालला नाही आणि पोलिसांनी त्याला अटक झाली.

हेही वाचा - धक्कादायक! नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; एका महिलेसह 4 जणांना अटक

विजयने फक्त सरकारी अधिकाऱ्यांचीच फसवणूक केली आहे हे आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झालं आहे. पण तो फक्त सरकारी अधिकाऱ्यांची फसवणूक का करायचा? याचा शोध पोलीस घेत आहेत. विजयला पोलिसात भरती होता आलं नाही त्याचा राग म्हणून विजयने मुंबई पोलिसांचा गणवेश घालूनच सरकारी अधिकाऱ्यांची फसवणूक केली का? की त्याला भरती होता आलं नाही म्हणून त्याला सिस्टमला धडा शिकवायचा होता? या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी मुंबई पोलिसांकडे नाहीत.

Published by: Akshay Shitole
First published: February 22, 2021, 8:03 AM IST

ताज्या बातम्या