मुंबई, 4 जानेवारी : आता रेल्वेतील महिला प्रवाशांकडे पाहणे पुरुष प्रवाशांना महागात पडू शकते. कारण एका महिला प्रवाशाच्या तक्रारीवरुन रेल्वे पोलिसांनी एका पुरुष प्रवाशाचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज जारी केलं आहे. त्यानुसार फोटोतील ही व्यक्ती फक्त महिला डब्यांच्या बाजूला असलेल्या अपंग डब्यातून प्रवास करते आणि प्रवासादरम्यान सतत हा पुरुष प्रवाशी महिलांकडे एक नजर पाहतो.
विशेष म्हणजे हा पुरुष प्रवासी लोकल ट्रेन सुरू झाल्यावरच धावती ट्रेन पकडतो आणि उतरताना देखील धावत्या ट्रेनमधूनच उतरतो. हा पुरुष प्रवासी कुठेही दिसल्यास रेल्वे पोलिसांना तात्काळ याची माहिती द्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच स्टेशन ड्युटीवरील सर्व कर्मचाऱ्यांना या आरोपीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं असून सर्वांनी स्टेशनवर या व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेशही रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहेत.
'हा संशयित आढळून आल्यास त्याला ताब्यात घ्यावं. पोलिसांना मदतीसाठी कळवावं. धावत्या ट्रेनमध्ये हा आरोपी दिसल्यास तात्काळ पुढील रेल्वे पोलीस स्टेशनला अलर्ट करायचे आहे. हार्बर मार्गावरील पनवेल ते कुर्ला वडाळा, CSTM, अप व डाउन सर्व लोकलमध्ये अपंगांचे डबे तपासण्यात यावेत,' असे आदेश4ही रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहेत.
रेल्वे पोलिसांनी या पुरुष प्रवाशाला शोधण्यासाठी हा प्रवासी धावत्या लोकल ट्रेनमधून उतरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहेत. ज्यात तो पुरुष प्रवासी वेगाने धावणाऱ्या लोकल ट्रेनमधून उतरताना दिसत आहे. तसंच त्याचे 3 फोटो जारी केले आहेत. ज्यामध्ये त्या रुष प्रवाशाचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. डोक्यावर कमी केस असलेला उभ्या चेहऱ्याचा हा पुरुष प्रवासी असून फोटोत त्याने नारंगी रंगाचा शर्ट आणि खाकी पँट घातल्याचे दिसत आहे.