मुंबई, 3 सप्टेंबर : गगनचुंबी इमारती, अगदी अद्ययावत सुविधांनी सज्ज अशी घरं. कुणाचं स्वप्न नसेल की अशा घरात राहायला जावं. मुंबईतल्या अशा घरात राहायचं म्हणजे किमान 1 ते दीड लाख दरमहा भाडं आलंच. पण वर्क फ्रॉम होमच्या या काळात अशी घरभाडे भरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अनेक रिकाम्या घरांसाठी घरमालक थेट 30 ते 50 हजारांची सूट देत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबई, बांद्रा, सांताक्रूझ, अंधेरी लोखंडवाला, जुहू सारख्या प्रीमियम परिसरात घरभाड अगदी 25 ते 30 टक्के इतकं कमी झालं आहे.
मुंबई रिअल इस्टेट महागाईच्या बाबतीत जगात अग्रेसर आहे. जवळपास 13 लाख घरं इथे भाड्याने घेतली जातात. पण कोविडच्या काळात पगारात झालेली कपात आणि घरून काम करण्याची मुभा यामुळे अनेक छोट्या शहरातून मुंबईत कामासाठी आलेली मंडळी आपापल्या घरी परतली आहेत किंवा इथे असणाऱ्यांनाही इतकं घरभाडे भरण शक्य नाही. जी कथा घरांची, तीच कथा व्यावसायिक गाळ्यांची.
घरभाड्यातील कपाती बरोबरच घर खरेदी करणाऱ्यांना ही सुवर्णसंधी आहे. खारसारख्या परिसरातील 3.5 कोटीला विकणारी घर आज मात्र 3 कोटीला विकली जात आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे आणि घरही हवंच आहे अशांनी या संधीचं सोनं करायचं ठरवलं आहे. लियासीस फोरास या संस्थेच्या सर्वेनुसार मुंबई महानगर प्रदेशात जानेवारी , फेब्रुवारी आणि मार्च या काळात सरासरी 17900 घर विकली जात होती. पण कोविडच्या काळात मात्र ही स्थिती बदलली आणि एप्रिल मध्ये एकही घर विकलं गेलं नाही, पण मे, जून आणि जुलै मध्ये सरासरी 5600 घरं विकली गेली.
मुंबईतील घरभाड जवळपास 25 ते 30 टक्के इतकं कमी झाल्याने बांद्रा सारख्या ठिकाणी जर तुम्हाला भाड्याने घर घ्यायचं असेल तर हीच संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.