मुंबई, 28 डिसेंबर : मुंबईतील (Mumbai) सायन परिसरातील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटला भीषण आग लागली. सुदैवाने वेळीच घरातील सदस्य बाहेर पडल्यामुले या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रतीक्षा नगरमधील (pratiksha nagar mhada colony) इमारत क्रमांक 14 मध्ये आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास आग लागली होती. घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे फ्रिज आणि गॅस सिलेंडरला आग लागली होती. घरातील सदस्य हे झोपलेले होते. आगीची तीव्रता वाढल्यामुळे त्यांना जाग आली एकच धावपळ उडाली.
सिलेंडरला आग लागल्याचे पाहिल्यावर सर्वांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. घरात दोन महिला आणि 2 लहान मुली होत्या. वेळीच सर्वजण बाहेर आले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केले. बघता बघता संपूर्ण फ्लॅट आगीच्या भक्षस्थानी सापडला.
स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या प्रयत्न आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या उशीराने दाखल झाल्यामुळे तोपर्यंत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. आग आता आटोक्यात आली असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.