Home /News /mumbai /

काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, प्रदेशाध्यक्षानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी 3 नेत्यांची नावं चर्चेत!

काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, प्रदेशाध्यक्षानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी 3 नेत्यांची नावं चर्चेत!

जर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाले तर भविष्यात विधानसभा अध्यक्ष देखील बदलावे लागतील.

मुंबई, 04 फेब्रुवारी : काँग्रेसमध्ये (Congress) प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.  नाना पटोले यांचे नाव निश्चित समजले जात आहे. जर नाना पटोले (Nana Patole) प्रदेशाध्यक्ष झाल्यास रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून संग्राम थोपटे (Sangram Thopte), सुरेश वारपूडकर (Suresh Varpurdkar) आणि अमीन पटेल (Amin Patel) यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पद सोडण्यास तयारी दाखवली आहे. त्यामुळे  प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव चर्चेत आले आहे. जर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाले तर भविष्यात विधानसभा अध्यक्ष देखील बदलावे लागतील. त्या अनुषंगाने काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांची नावं आता विधानसभा अध्यक्षपदासाठी प्राथमिक चर्चेला समोर येत आहेत. नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून  निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे. अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमध्ये जोपर्यंत अधिकृत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बदलण्याबाबत स्पष्ट भूमिका केली जात नाही, तोपर्यंत अशा चर्चांना फारसा अर्थ नसतो, असं मत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या