वसई, 01 जून: घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या दोन चोरांशी (thieves enters in home) एका महिला डॉक्टरने कडवी झुंज दिली आहे. महिला डॉक्टरच्या धाडसामुळे चोरांचा चोरीचा प्रयत्न पुरता फसला आहे. ही घटना रविवारी पहाटे नालासोपारा पश्चिम (Nalasopara West) येथील हनुमान नगर याठिकाणी घडली आहे. यातील एका चोरट्याला अटक करण्यात आली असून दुसऱ्या चोरटा अद्याप फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. घरात एकट्या राहणाऱ्या महिला डॉक्टरने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने हा चोरीचा प्रयत्न फसला आहे. सोबतचं जीवितहानीही टळली आहे.
संबंधित चोरट्यांशी झुंज देणाऱ्या 35 वर्षीय महिला डॉक्टरचं नाव शीतल आल्हाट असून त्या मुंबईच्या चेंबूर येथील रहिवासी आहेत. पण त्यांच्या घराचं नूतनीकरणाचं काम सुरू असल्याने त्या नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील आपल्या मैत्रिणीच्या रिकाम्या घरात काही दिवस वातव्यासाठी आल्या होत्या. शिवाय त्यांचे पती कामानिमित्त बाहेरगावी राहात असून त्यांची दोन्ही मुलं आजोळी अहमदनगर याठिकाणी गेली आहेत.
त्यामुळे त्या सध्या घरी एकट्याच राहात होत्या. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रविवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी आलेल्या आवाजामुळे त्यांना अचानक जाग आली. डोळे उघडल्यानंतर त्यांच्यासमोर दोन चोरटे हातात सुरा घेऊन उभे होते. हॉलमधील खिडकीची काच सरकावून त्यांनी घरात प्रवेश केला होता. यानंतर चोरट्यांनी डॉ. शीतल यांना सुऱ्याच्या धाक दाखवत त्याच्या तोंडात बोळा कोंबला आणि हात बांधण्याचाही प्रयत्न केला.
हे वाचा-त्याच्या मोबाईल चोरीमुळे 3 महिन्याचे बाळ झाले पोरके, मुंबईतील मन हेलावून टाकणारी
पण डॉ. शीतल यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत चोरट्यांचा प्रतिकार केला आहे. शिवाय मदतीसाठी आरडाओरडही केली. यामुळे चोरटे गोंधळले आणि त्यांनी मुख्य दारातून पळ काढला. यावेळी चोरट्यांनी शीतल यांचा मोबाईल आणि पाच हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. पण यातील एका चोरट्याला शीतल यांनी ओळखलं. संबंधित चोरटा हुसेन शेख असून त्याच इमारतीत राहात असल्याचं त्यांनी ओळखलं. याप्रकरणी डॉ. शीतल यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी हुसेन शेख आणि अन्य एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी हुसेन शेखला अटक केली असून अन्य एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Theft