मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरण : मुस्तफा डोसाला फाशी द्या, सीबीआयची मागणी

मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरण : मुस्तफा डोसाला फाशी द्या, सीबीआयची मागणी

१९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणामध्ये सीबीआयनं आज (मंगळवारी) मुस्तफा डोसा आणि फिरोज खान याला फाशीची मागणी केली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

27 जून : १९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणामध्ये सीबीआयनं आज (मंगळवारी) मुस्तफा डोसा आणि फिरोज खान याला फाशी देण्यात यावी अशी मागणी विशेष टाडा कोर्टात केली आहे.

साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची भूमिका ही याकूब मेमनपोक्षाही मोठी असल्यानं आपण दोघांकरता फाशीची मागणी करत असल्याचं सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी सांगितलं. या सर्व आरोपींना गुन्हा करतानाही आणि गुन्ह्यानंतरही पश्चातापाचा कोणताही लवसेश नसल्याचं सीबीआयनं आपल्या युक्तीवादात म्हटलंय.

मुस्तफा डोसाबद्दलचा युक्तीवाद

डोसा हा बाॅम्बस्फोटासाठी मेंदू म्हणून काम करत होता. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात करण्यात मुस्तफाचा सहभाग होता. मोहम्मद डोसा या बाॅम्बस्फोटासाठी जी दुबईत बैठक झाली होती त्यात सहभागी होता. या बैठकीला दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम, टायगर मेमन यांच्यासह सहभागी झाला होता.

बाबरी मशीद पडल्यानंतर ज्या दंगली झाल्या त्याचा बदला घेतला पाहिजे असं या बैठकीत ठरवण्यात आले होते. विध्वंस करण्यासाठी जी शस्रास्रं आणि आरडीएक्स आणण्यात आलं त्यासाठी मुस्तफानं प्रमुख भूमिका बजावली. त्यानं इतर आरोपींना दुबई आणि पाकिस्तानला जाण्या-येण्याची आणि राहण्याची सोय केली. त्यानं काही आरोपांचा पाकिस्तानात जाण्यासाठी दाऊदच्या सुचनांनुसार पासपोर्टची सोय केली.

मुस्तफा दाऊदच्या दुबईतल्या व्हाईट हाऊस या घरीही स्फोटाच्या प्रकरणात बैठकीतही डोसा सहभागी झाला होता. मुस्तफा हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून तो इतरांनाही सूचना करत होता यातून त्याला या प्रकरणात किती मोठे अधिकार होते हे स्पष्ट होतं.

त्यानं फिरोझ खानला या प्रकरणातील शस्रास्रं नष्ट करण्याचे आदेश दिले होते. या प्रकणात मुस्तफानं याकूबपेक्षाही जास्त महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बाॅम्बस्फोटाकरता मुस्तफा थेट जबाबदार होता. मुस्तफा हा कुप्रसिद्ध स्मगलर होता. त्यानं एका मुलासोबत अनैसर्गिक कृत्यदेखील केल्याची तक्रार पीडित मुलाच्या आईने केली होती. स्मगलिंगच्या प्रकरणावरून त्यानं एका व्यक्तीची बंगळुरुमध्ये हत्यादेखील घडवून आणली होती.

भारत-पाकिस्तान-वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान झालेल्या तिंरगी मालिकेत त्यानं सट्टेबाजी केली होती. त्याच्यावर गुजरातमध्ये टाडा अंतर्गत केसेस सुरू आहेत. अबू सालेमवर त्यानं आर्थर रोड जेलमध्ये हल्ला केला होता. डोसाची कायद्याला न मानण्याची वृत्ती असून या प्रकरणात जे कोणी पळून देशाबाहेर गेले होते त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यामुळे मुस्तफाला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

 

फिरोज खान बद्दलचा सीबीआयचा युक्तीवाद

फिरोज खान हा या कटकारस्थानातला एक प्रमुख होता. आपण काय करत होतो याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्याला आपण करत असलेल्या गोष्टींच्या परिणामाची पूर्ण जाणीव होती. पाकिस्तानातून भारतात येणा-या शस्रास्रांची आणि आरडीएक्सची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यानं ती उतरवून घेण्याची पुरेपूर व्यवस्था केली. त्यानंतर ती शस्रास्रं आणि आरडीएक्स लपवून ठेवण्याची व्यवस्थाही त्यानं केली. मुस्तफा डोसा आणि मोहम्मद डोसा यांच्या सुचनांचं तो तंतोतंत पालन करत होता. तो दाऊद इब्राहिमच्या कराचीतल्या गेस्ट हाऊसला दोनदा जाऊन आला आहे. त्यानं खोटे पासपोर्टही तयार केले होते. डोसा स्मगलिंग करत असे, तो खंडणीही गोळा करायचा तसंच १९९२ च्या दंगलीतही त्याचा सहभाग होता. तो स्वत:ही गुन्हे करायचा आणि इतरांनाही तसं करा असं सांगायचा. त्याचे वडील हे नौदलात होते पण यानं मात्र देशाविरुद्ध काम केलं आहे आणि म्हणून याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 07:32 PM IST

ताज्या बातम्या