लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर
लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. यानंतर आता मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं आहे.
मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण संबंधित मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा दावा महानगर पालिकेनं केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील रहिवासी असणाऱ्या 15 वर्षीय आर्याने 8 जानेवारी रोजी राजावाडी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर 12 जानेवारी तिचा अचानक मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचा मजकूर तिच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. यानंतर पालिकेची यंत्रणा सतर्क झाली, त्यांनी संबंधित व्यक्तीकडे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचे पुरावे मागितले. पण त्याच्याकडे एकही पुरावा नव्हता.
हेही वाचा-70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना
या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मृत मुलीच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. या भेटीनंतर महापौर पेडणेकर यांनी सांगितलं की, मृत आर्याच्या आजोबांच्या मते लसीकरणामुळे तिचा मृत्यू झालेला नाही. तिने अभ्यासाचा अतिताण घेतला होता. हा ताण असह्य झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दु:खद प्रसंगी कोणीही याचं राजकारण करू नये, असं आवाहनही महापौरांनी केलं आहे.
हेही वाचा-नागपूर: सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा हकनाक बळी, जन्मदातीनेच दिला भयंकर मृत्यू
याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, संबंधित मुलीचा लसीकरण घेतल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर मृत्यू झाला आहे. तसेच खाजगी डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असं लिहिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.