नवी मुंबई, 18 नोव्हेंबर : कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा मुंबई -पुणे हायवेवर (Mumbai Pune Express Way) कामोठे (Kamothe) येथे भीषण अपघात झाला. भरधाव बस (Bus accident) थेट रस्त्यालगत असलेल्या डिव्हाडरमध्येच घुसली. या अपघातात 15 जण जखमी झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नवी मुंबईजवळील कामोठे इथं मुंबई-पुणे हायवेवर बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. एक खासगी ट्रव्हल्सची बस कोल्हापूरहुन 30 ते 40 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत होती. कामोठे इथं बस पोहोचल्यावर अचानक ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि रस्त्यालगत असलेल्या डिव्हाडरवर बस जावून धडकली आणि थेट भुयारी मार्गासाठी बनविण्यात आलेल्या भितींत जाऊन घुसली.
हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव वेगात असलेली बसचा समोर भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. या अपघातात ड्रायव्हर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 35 ते 40 प्रवाशी होते.
ड्रायव्हरची प्रकृती सद्या चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर बस भिंतीमध्ये जावून अडकली होती. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमधील प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले. जखमी असलेल्या प्रवाशांना कामोठे एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो-कंटेनरच्या धडक, 10 ठार
दरम्यान, गुजरातमधील वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर (Vadodara National Highway) टेम्पो आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी आहे.
वडोदरा जिल्ह्यातील वाघोडियाजवळ आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सूरत येथील एक कुटुंब आपल्या नातेवाईकांसह पावगड इथं दर्शनाला जात होते. वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील वाघोडिया चौकात पोहोचले असता भरधाव आयशर टेम्पो आणि कंटेनरची समोरसमोर जोरात धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात टेम्पोचा समोरच्या भागाचा चुराडा झाला. टेम्पोमध्ये समोर बसलेले तरुण जागीच ठार झाले. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण जखमी झाले आहे. सर्वजण हे सूरत येथील राहणार होते.