मुंबई, 15 जानेेवारी: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील इंधनावर होत आहे. मुंबईत डिझेलचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहेत, पेट्रोलही त्याच मार्गावर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 पैसे आणि 26 पैशांनी वाढ झाली आहे. परिणामी मुंबईत डिझेलचे दर 81.58 रुपये लीटर आहेत.
राज्याच परभणीमध्ये सर्वाधिक महाग दराने पेट्रोलची विक्री होत आहे. परभणीत पेट्रोलचे दर 93.69 रुपये प्रति लीटर आहेत. आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर हे दर पोहोचले आहेत.
परभणीमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक असण्याचं काय कारण?
वाहतुकीसाठी लागणारी किंमत पेट्रोलच्या किंमतीवर जास्त परिणाम करत आहेत. काही मीडिया अहवालाना स्थानिक लोकल डीलर्सनी दिलेल्या माहितीनुसार परभणीमध्ये मनमाड आगारातून पेट्रोल आणावं लागतं. मनमाड 320 किलोमीटर दूर आहे. या दरम्यान त्यांना 4 टोलनाक्यांमध्ये टोल भरावा लागतो, शिवाय इतर काही खर्च असतो. या सर्वांमुळे परभणीत पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वाधिक असतात.
देशामध्ये सर्वाधिक महाग दराने पेट्रोल आणि डिझेल राजस्थानच्या गंगानगरमध्ये मिळते याठिकांणी पेट्रोल 96.63 रुपये लीटर तर डिझेल 88.30 रुपये लीटर आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमागे उत्पादन शुल्कात झालेली वाढ हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर 32.98 रुपये तर डिझेलवर 31.83 रुपये उत्पादन शुल्क आकारत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर 26 टक्के तर डिझेलवर 24 टक्के व्हॅट आकारण्यात येत आहे. त्यावर आाकारण्यात येणारा सेस अनुक्रमे 10.20 रुपये आणि 3 रुपये असा आहे.
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.