मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फायद्याची बातमी: सरकारच्या 'या' योजना तुम्हाला मिळवून देणार 'दुप्पट फायदा'

फायद्याची बातमी: सरकारच्या 'या' योजना तुम्हाला मिळवून देणार 'दुप्पट फायदा'

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या पर्यायांचं सखोल विश्लेषण केलं पाहिजे. उदाहरणार्थ, गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय आहे? गुंतवणुकीतून तुम्हाला किती परतावा मिळेल? योजनेचा कालावधी किती आहे? या आणि इतर अनेक तपशील तुम्ही माहिती करून घेतले पाहिजेत.

नागरिकांना पैशांची बचत आणि गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्र सरकारच्याही अनेक बचत योजना आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) सुरू करण्यात आलेली आहे.

याशिवाय, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या दोन बचत योजनाही चांगल्या आहेत. पीपीएफमध्ये, तुम्हाला चांगल्या व्याजदरांसह दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय मिळतो. तर, एनसीएसमध्ये चांगल्या व्याजासह टॅक्स बेनिफिट्स मिळतात. याठिकाणी तिन्ही सरकारी बचत योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या योजनेत दरवर्षी गुंतवणुकीच्या 6.8 टक्के व्याज मिळतं. हे सर्वांत लोकप्रिय स्मॉल सेव्हिंग इन्स्ट्रूमेंट्सपैकी एक आहे. एनएससीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते. ही योजना पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये एका वर्षात किमान एक हजार रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. या योजनेत एनएससी 8 इश्यु, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली आणि ट्र्स्ट यांच्याव्यतिरिक्त कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)

पीपीएफ योजना हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. या योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याजदर मिळतो. मिळालेलं व्याज आणि परतावा आयकर कायद्यानुसार करपात्र नाहीत. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत या योजनेतील पैशांवर कर सवलत मिळवण्यासाठी दावा केला जाऊ शकतो. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खातं सुरू करू शकता. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरू शकता.

सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय)

देशातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर 7.6 टक्के परतावा मिळतो. खातं उघडल्यापासून 21 वर्षं किंवा मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर लग्न होईपर्यंत या योजनेचा कार्यकाळ आहे. किमान 250 रुपये भरून एसएसवाय खातं उघडता येतं. गुंतवणुकीची कमाल मर्यादा प्रति वर्ष 1.5 लाख रुपये इतकी आहे. एसएसवायमध्ये गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्यातील कलम 80सी अंतर्गत कर सवलत मिळते.

वरील तिन्ही योजना परतावा आणि कर सवलतीच्यादृष्टीनं चांगल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यांची निवड करू शकता.

First published:

Tags: Bank services, Money, Post office money