Home /News /money /

Overdraft Facility : फायद्याचा सौदा! पैशांची गरज असेल तर कर्ज काढण्याऐवजी घ्या ही सुविधा

Overdraft Facility : फायद्याचा सौदा! पैशांची गरज असेल तर कर्ज काढण्याऐवजी घ्या ही सुविधा

काही बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (Non-Banking Financial Institutions) ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधेचा (Overdraft Facility) लाभ देतात; मात्र फारच थोड्या जणांना या सुविधेबद्दल माहिती असते.

मुंबई, 6 ऑगस्ट : काही बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (Non-Banking Financial Institutions) ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधेचा (Overdraft Facility) लाभ देतात; मात्र फारच थोड्या जणांना या सुविधेबद्दल माहिती असते. अचानक पैशांची गरज भासली, तर ही सुविधा खूप फायदेशीर ठरते. सामान्यपणे जास्त पैशांची गरज भागवण्यासाठी ग्राहक कर्जाचा पर्याय निवडतात. हे कर्ज बँकांकडून किंवा नातेवाईक, मित्रमंडळींकडून घेतलं जातं. त्याव्यतिरिक्त ओव्हरड्राफ्ट सुविधेचा पर्यायही ग्राहकांकडे उपलब्ध असतो. काय असते ओव्हरड्राफ्ट सुविधा? ओव्हरड्राफ्ट सुविधेमध्ये ग्राहक बँक खात्यात असलेल्या जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम काढू शकतात. बँका किंवा वित्तीय संस्था काही ग्राहकांना पूर्वपरवानगीनं ही सुविधा देतात. काही ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा लागतो. बँकेच्या शाखेत जाऊन किंवा इंटरनेटवरूनही या सुविधेसाठी अर्ज करता येतो. काही बँका या सुविधेसाठी फी घेतात. ग्राहकांनी अर्ज करण्याआधी प्रोसेसिंग फीबाबत माहिती करून घ्यावी. सॅलरी अकाउंटवरही (Salary Account) ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. यात पगाराच्या दुप्पट किंवा तिप्पट ओव्हरड्राफ्ट लिमिट असतं. यासाठी ज्या बँकेतून ओव्हरड्राफ्ट घ्यायचा आहे, त्याच बँकेत सॅलरी अकाउंट असावं लागतं. पैसे परत करण्याची मर्यादा ओव्हरड्राफ्ट सुविधेद्वारे घेतलेली रक्कम परत करण्यासाठी एक निश्चित अवधी दिला जातो. तसं न केल्यास व्याज आकारलं जातं. तुमचं ओव्हरड्राफ्ट लिमिट बँक किंवा संस्थाच ठरवते. प्रत्येक बँक किंवा संस्थेनुसार ही मर्यादा वेगवेगळी असते. दोन पद्धतींची सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरक्षित आणि असुरक्षित अशा दोन पद्धतीच्या असतात. सुरक्षित सुविधेसाठी (Secured Overdraft) काही ना काही तारण ठेवून घेतलं जातं. उदा. घर, विमा पॉलिसी, सॅलरी, एफडी, शेअर्स असं काहीही तारण ठेवून ही सुविधा घेतली जाते. तारण ठेवण्यासाठी काही उपलब्ध नसेल, तर दुसऱ्या पद्धतीनं ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येतो. क्रेडिट कार्डचा वापर म्हणजे असुरक्षित ओव्हरड्राफ्ट (Unsecured Overdraft) असतो. खासगी कर्जाच्या ऐवजी हा अतिरिक्त पैशांसाठी चांगला पर्याय आहे. यात व्याज न देता नियोजित वेळेत रक्कम बँकेला परत करण्याची सवलत असते. तसंच व्याज असलं, तरी ते रक्कम ग्राहकांजवळ असेपर्यंतच द्यावं लागतं. सर्वसाधारणपणे बँकेत जमा रक्कम असेल, तितकीच रक्कम आपण काढू शकतो असा ग्राहक विचार करतात; मात्र ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे खात्यावर जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढता येणं शक्य होऊ शकतं. खासगी कर्जापेक्षा हा पर्याय कधीकधी अधिक सोयीचा व सोपा ठरतो.
First published:

पुढील बातम्या