मुंबई, 27 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2023 सादर करताना आधीच अस्तित्वात असलेल्या काही बचत योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदलांसह, नवीन करप्रणाली आणि आयकर स्लॅबमध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही नवीन योजनाही जाहीर केली होती.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना नेमकी काय आहे?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही भारत सरकारची 2023च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली वन टाइम म्हणजे एकाच वेळी गुंतवणूक करण्यासारखी नवीन अल्पबचत योजना आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मार्च 2025पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. यामध्ये महिला किंवा मुलींच्या नावावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवता येईल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा व्याजदर किती आहे?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिला किंवा मुलीच्या नावावर दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम दोन वर्षं कालावधीसाठी ठेवू शकता. यावर 7.5 टक्के निश्चित व्याजदर मिळेल. तसंच गरज पडल्यास मुदतपूर्तीआधी थोडे पैसे काढता येण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असेल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र हा अल्प मुदतीसाठी एखाद्या महिलेच्या नावे मुदत ठेव (एफडी) ठेवण्यासाठी योग्य पर्याय आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.
'बँक एफडीपेक्षा या योजनेतून मिळणारा परतावा जास्त आहे आणि गरज पडल्यास थोडे पैसे काढता येण्याच्या सुविधेमुळे लिक्विडिटीची चिंता कमी आहे' असं बँकबाजार डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांनी `मनीकंट्रोल`शी बोलताना सांगितलं.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र केव्हा लाँच होणार?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची करआकारणी कशी असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणं अपेक्षित आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज कसा कराल?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना देशभरातल्या बँका आणि पोस्ट ऑफिसमधून लागू केली जाईल. अलीकडेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, की सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी विशेष मोहिमेद्वारे या योजनेचा प्रचार करावा.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेत काय फरक आहे?
सुकन्या समृद्धी योजना : सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची अल्पबचत योजना आहे. ही योजना केवळ मुलींसाठी आहे. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्चाच्या दृष्टीने बचतीसाठी ही योजना फायदेशीर ठरते. सुकन्या समृद्धी योजनेत सध्या 7.6 टक्के व्याजदर मिळतो. तो वार्षिक चक्रवाढ पद्धतीने आकारला जातो. मुलीचं वय 10 वर्षं पूर्ण होण्यापूर्वी तिच्या नावावर हे खातं उघडता येतं. या खात्यात एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येत नाही. सुकन्या समृद्धी योजनेत कलम 80 सी अंतर्गत करसवलत मिळते. खातं उघडल्यापासून 21 वर्षांनी किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी, यापैकी जे आधी असेल त्या वेळी खातं मॅच्युअर होतं. खातेदाराचं वय 18 वर्षं पूर्ण होणं किंवा ती दहावी उत्तीर्ण होणं, यापैकी जे आधी होईल त्या वेळी, शिक्षणासाठी या खात्यातून जास्तीत जास्त 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle