अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे परदेशवारी किंवा देशांतर्गत विमान प्रवास करण्याचं प्रमाण वाढलं आहे. व्यवसाय, पर्यटनाच्या निमित्ताने वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विमान प्रवास हे अनेकांचं स्वप्न असतं. पहिल्या विमानप्रवासाविषयी अनेकांच्या विविध आठवणीदेखील असतात. रेल्वे, एसटी, बसमधून प्रवास करताना आपण विंडो सीट अर्थात खिडकीजवळची सीट मिळवण्याचा प्रयत्न करतो. विमानप्रवास करतानाही अनेकांना विंडो सीट हवी असते; पण विमानातल्या काही सीट्स सुरक्षित आणि कमी धोकादायक मानल्या जातात. विमानाला अपघात झाला तरी या सीट्सवर बसलेल्या प्रवाशांना धोका कमी असतो. दुसरीकडे काही सीट्स प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतात, असं एव्हिएशन एक्सपर्ट्स सांगतात. त्यामुळे विमान प्रवास करताना नेमकी कोणत्या बाजूची सीट निवडावी हे जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
मौल्यवान वस्तू ट्रेन किंवा विमानातच विसरलात? अशी मिळवता येईल परत
विमानातील कोणती सीट सर्वाधिक धोकादायक ठरू शकते आणि कोणती सीट कमी धोकादायक असते, याविषयी एव्हिएशन एक्स्पर्ट्सनी माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, विमानातल्या मध्यभागी असलेल्या सीट्स निवडणाऱ्या प्रवाशांना 44 टक्क्यांपर्यंत धोका असतो. सर्वांत कमी धोकादायक जागा विमानातल्या मागच्या बाजूस असते. अपघात झाल्यास विमानाच्या काही सीट्सवर मृत्यूचा धोका का वाढतो याचं कारणही तज्ज्ञांनी दिलं आहे. विमानप्रवासादरम्यान अपघात झाला तर प्रवाशाच्या जिवाला धोका किती असेल हे त्याच्या सीटच्या स्थितीवरून समजू शकतं. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 105 विमान अपघातांवर संशोधन केलं आणि विमान अपघातातून वाचलेल्या 2000 प्रवाशांची माहिती गोळा केली.
IRCTC देतेय दुबई फिरण्याची संधी, कमी खर्चात मिळणार 'या' सुविधा
जेव्हा विमानात आग लागण्याची घटना घडते तेव्हा विंडो सीटवर बसलेल्यांना सर्वाधिक धोका असतो. हे प्रवासी वाचण्याची शक्यता 53 टक्क्यांपर्यंत असते. विमानाच्या पुढच्या बाजूच्या सीटवरचे प्रवासी वाचण्याची शक्यता 65 टक्क्यांपर्यंत असते. 1985मध्ये मँचेस्टर विमानतळावर विमानाच्या इंजिनात स्फोट झाल्याने आग लागून 55 प्रवाशांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी सामान्य गेटच्या तुलनेत एक्झिट गेटपासून दुप्पट अंतरावर बसल्याने मृत्युमुखी पडल्याचं या घटनेच्या तपासात शास्त्रज्ञांना आढळून आलं.
ग्रीनवीच युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, विमान अपघात झाल्यास, जे इमर्जन्सी गेटजवळ बसलेले असतात त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता जास्त असते. कारण अशा स्थितीत ते लवकर बाहेर पडू शकतात आणि त्यांचे प्राण वाचू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, इमर्जन्सी किंवा आगीच्या प्रसंगी जीव वाचविण्याच्या दृष्टीने एक्झिट गेटजवळच्या सीटच्या पाच रांगा प्रवाशांसाठी सर्वोत्तम आहेत.
सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक डोग डुरी यांनी 1989मध्ये अमेरिकेतल्या लोवा इथल्या विमान अपघाताचं उदाहरण देताना सांगितलं, की `या अपघातात 269पैकी 184 प्रवाशांचे प्राण वाचले होते. हे सर्व प्रवासी विमानातल्या फर्स्ट क्लासच्या मागच्या बाजूस बसले होते. फर्स्ट क्लासचा हा भाग पायलटच्या जवळ होता.`
आता कमी बजेटमध्ये करा लडाखची सैर! IRCTC देतेय खास संधी
आश्चर्याची बाब म्हणजे विमानात प्रवासी ज्या सीट्स बुक करण्यास प्राधान्य देतात त्यात धोका जास्त असतो. त्याच वेळी सर्वांत सुरक्षित जागा नेहमीच प्रवाशांच्या दृष्टीने कमी लोकप्रिय किंवा नापसंतीच्या असतात. `मधल्या मार्गावरच्या सीट्स सर्वाधिक धोकादायक असतात. कारण यामध्ये प्रवाशांना एका बाजूने सपोर्ट मिळतो. त्याचवेळी समोर बसलेले प्रवासी दोन्ही बाजूंनी सुरक्षित असतात, त्यामुळे त्यांना धोका कमी असतो. सर्वांत जास्त आवडीच्या विंडो सीट्सबाबत बोलायचं झालं तर संपूर्ण विमानातल्या सुमारे 75 टक्के विंडो सीट्स 38 ते 39 टक्के जोखमीच्या असतात,` असं डुरी यांनी सांगितलं.
`सुमारे 35 वर्षं चाललेल्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे, की विमानाच्या पुढच्या (39 टक्के) आणि मधल्या (38 टक्के) भागापेक्षा मागच्या भागातली जागा कमी जोखमीची असते. या ठिकाणी केवळ 32 टक्के धोका असतो,` असं डुरी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Lokmat news 18