नवी दिल्ली, 19 जुलै : भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhar Card) एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. सिमकार्ड खरेदी करण्यापासून सरकारी कामांपर्यंत आधार कार्डची आवश्यकता असते. अगदी नोकरीसाठी अर्ज करताना देखील आधार गरजेचे आहे. सरकारी योजनांचा फायदा घेताना देखील आधार कार्ड द्यावे लागते. अशावेळी आधार कार्ड संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी UIDAI ट्विटरवर (Twitter) देखील ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तर देण्यास सुरू केले आहे. जर तुम्हाला आधार कार्ड संबंधित एखादी समस्या आहे तर UIDAI च्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या समस्येचं निरसन करू शकता. याकरता आधार कार्डधारक @UIDAI आणि @Aadhaar_Care या ट्विटर अकाउंटवर जाऊन ट्वीट करू शकतात.
याव्यतिरिक्त आधार केंद्राच्या क्षेत्रीय कार्यालयांची देखील वेगवेगळी ट्विटर हँडल आहेत. त्यावर जाऊन देखील तुम्ही तुमची समस्या मांडू शकता. याठिकाणी तुम्ही आधार कार्ड संबधित कोणतीही समस्या, तक्रार देऊ शकता. आधारची ही सेवा कस्टमर केअर, फोन नंबर आणि मेल आयडी पेक्षा वेगळी सेवा आहे.
दरम्यान प्राधिकरणाचा कस्टमर केअर क्रमांक 1947 आहे. त्याचप्रमाणे help@uidai.gov.in वर मेल करून देखील तुम्ही आधार संबधित आवश्यक माहिती मिळवू शकता. लोकांची आवश्यकता लक्षात घेता UIDAI ने त्यांच्या विविध सेवा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. आधार कार्डावरील नावापासून फोन नंबर बदलण्यापर्यंत आणि पत्त्यापासून अन्य काही माहिती बदलण्यापर्यंत अनेक कामं ऑनलाइन करणे शक्य आहे.
आजकाल अधिकतर सरकारी विभाग सोशल मीडियाचा वापर करत आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण वेगाने होईल. ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे कंपन्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना ग्राहकांशी थेट संपर्क साधणे सोपे झाले आहे. केवळ UIDAI नव्हे तर अनेक सरकारी विभाग आता ऑनलाइन होत आहेत. मात्र प्रत्येक गावागावात, शहरात त्याकरता लागणारी इंटरनेट, नेटवर्कची सुविधा पोहोचणे गरजेचे आहे.