नवी दिल्ली, 7 जुलै : दररोज लाखो प्रवासी ज्यातून प्रवास करतात, अशी भारतीय रेल्वे (Indian Railways) वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोरोना काळात प्रथमच रेल्वेसेवा खंडित झाली. अर्थात, कोरोनाचा सुरुवातीचा कालखंड वगळता नंतरच्या काळात रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंपासून ऑक्सिजन सिलिंडरपर्यंतच्या वेगवेगळ्या वस्तूंची वाहतूक करण्याचं काम केलं. आता कोरोनाची लाट (Corona Wave) ओसरू लागली असून, रेल्वेची प्रवासी वाहतूक (Passenger Trains) हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. रेल्वेने प्रवास करताना योग्य तिकीट बरोबर असणं अत्यावश्यक असतं. तिकिटासोबतच आपल्याबरोबर आपलं ओळखपत्र असणंही अत्यंत आवश्यक असतं.
रेल्वेच्या प्रवासादरम्यान टीटीई (TTE) अर्थात तिकीट तपासनीस आपलं तिकीट पाहतात, तसंच ते आपलं फोटो असलेलं ओळखपत्रही (Photo ID) मागू शकतात. प्रवाशाने आपली ओळख सिद्ध करणं अत्यावश्यक असतं. त्यासाठी प्रवाशाने अधिकृत ओळखपत्र बाळगावं लागतं. प्रवासी ओळखपत्र दाखवू शकला नाही, तर त्याला विनातिकीट प्रवासी (Without Ticket Passenger) समजून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे आर्थिक नुकसान तर होतंच, पण बदनामी आणि मनस्तापही होतो.
अधिकृत ओळखपत्रांची विस्तृत यादी IRCTC आणि रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या ओळखपत्रांमध्ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचं पासबुक, पॅन कार्ड, शाळा किंवा कॉलेजचं ओळखपत्र, बँकांकडून देण्यात आलेलं क्रेडिट कार्ड आदींचा समावेश असतो. याशिवाय आणखी काही कागदपत्रंही ओळखपत्र म्हणून चालू शकतात. त्यांची यादी रेल्वेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
1,56,98,97,00,00,000.00रुपये!मोजता मोजता थकाल,Jeff Bezosयांनी कमवली इतकी संपत्ती
'झी न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याचं युग डिजिटल आहे. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये त्यानुसार बदल होत आहेत. तुम्ही ऑनलाइन रिझर्व्हेशन केलं असेल, तर रेल्वेचं तिकीट छापील स्वरूपातच दाखवणं बंधनकारक नाही. रेल्वेकडून आलेला तिकिटाबद्दलचा अधिकृत मेसेज किंवा अधिकृत ई-मेल दाखवला तरी तो ग्राह्य धरला जातो. त्याप्रमाणेच ओळखपत्रंही डिजिटल स्वरूपात सादर केली तरी चालतात. अर्थात, आपण पीडीएफ फाइल किंवा इमेज स्वरूपात फोनवर सेव्ह केलेली ओळखपत्रं दाखवून चालत नाही.
डिजिलॉकरमध्ये (Digilocker) असलेली अधिकृत ओळखपत्रं दाखवावी लागतात. डिजिलॉकर ही केंद्र सरकारने तयार केलेली यंत्रणा असून, त्यात सर्व्हरवरून डाउनलोड झालेल्या कागदपत्रांना अधिकृत दर्जा आहे. आयटी अॅक्टमधल्या (IT Act) कलमानुसार प्रत्यक्ष स्वरूपात ओळखपत्र दाखवण्याप्रमाणेच डिजिलॉकरमधली ओळखपत्रं दाखवणंही 100 टक्के वैध आहे. डिजिलॉकर आता मोबाइलमध्ये अॅप स्वरूपात डाउनलोडही करून घेता येतं. त्यामुळे त्यामधली ओळखपत्रं दाखवून तुम्ही तुमची ओळख पटवू शकता.
हे सगळे पर्याय असले, तरी घरातून बाहेर पडताना कायमच आपल्यासोबत आपली ओळखपत्रं घेऊनच बाहेर पडणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे. कधी विसरलोच, तर त्या वेळी डिजिलॉकरसारखे पर्याय आपल्या कामी येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway