नवी दिल्ली 28 मे : अनेकांना पुरातन वस्तू (Old things), नाणी (Coins), नोटा जमा करण्याचा छंद असतो, तर काहीजण अशा जुन्या, दुर्मीळ गोष्टी जमवून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून अब्जाधीश झालेले लोक जगभरात पाहायला मिळतात. जुन्या वस्तूंना त्या काळातील सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक संदर्भ जोडलेले असल्यानं त्यांचे मूल्य अधिक असते. त्यामुळंच त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) मोठी मागणी असते. वाटेल ती किंमत देऊन काही लोक अशा वस्तू विकत घेतात. आजकाल तर अशा दुर्मीळ वस्तूंचे लिलाव ऑनलाइन (Online Auction) होतात. काही वेबसाइटस यासाठी प्रसिद्ध आहेत.
सध्या भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील (Pre Independence Era) एक रुपयाच्या (One Rupee Coin) विशिष्ट नाण्याला मोठी मागणी आली आहे. एका ई-कॉमर्स वेबसाइटनं या विशिष्ट नाण्याला एक लाख रुपयांहून अधिक किंमत मिळवून देण्याची नामी संधी उपलब्ध केली आहे. हे नाणं आहे 1862 मधील राणी व्हिक्टोरियाचा (Queen Victoria) छाप असलेले एक रुपयाचे चांदीचे नाणे (Silver Coin). ई-कॉमर्स साइट क्विकरवर (Quickr) 1862 मधील राणी व्हिक्टोरियाचा छाप असलेलं एक रुपयाचं चांदीचं नाणे सध्या दीड लाख रुपयांना विकलं जात आहे.
भारतात (India) अनेक नाण्यांचं उत्पादन पूर्वीच थांबवण्यात आलं आहे. त्यामुळं काही नाणी दुर्मीळ नाण्यांच्या श्रेणीत आली असून, त्यांच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यात या नाण्याचा समावेश आहे. तसंच काही भारतीय लोक दिवाळी (Diwali), धनत्रयोदशी, अक्षय तृतीया अशा शुभ प्रसंगी राणी व्हिक्टोरियाचा छाप असलेल्या नाण्यांची आवर्जून खरेदी करतात. त्यामुळं या नाण्याला मागणी आली आहे.
तुमच्याकडे असं प्राचीन दुर्मीळ नाणं (Rare Coin) असल्यास आणि त्याची विक्री करायची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला क्विकरवर ऑनलाइन विक्रेता म्हणून स्वत:ची नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर त्या नाण्याचे फोटो काढून ते साइटवर अपलोड करुन जाहिरात द्यावी लागेल. ज्या खरेदीदारांना अशी नाणी खरेदी करायची असतील ते क्विकरवरून थेट तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्ही खरेदीदारांशी वाटाघाटी करून पैसे देण्याची पद्धत आणि वस्तू पाठवण्याबाबतच्या अटीनुसार नाणे विकू शकता.
2019 मध्ये अमेरिकेत (USA) झालेल्या जुन्या नाण्यांच्या एका लिलावादरम्यान अत्यंत दुर्मीळ अशा चांदीच्या नाण्याला तब्बल 1.32 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल 9 कोटींपेक्षा जास्त किंमत मिळाली होती. एकेकाळी लॉसएंजेलिस लेकर्सचा मालक आणि दुर्मीळ नाण्यांचा मोठा संग्राहक असलेल्या जेरी बुस यांच्याकडे हे नाणं होतं. जेफ गॅरेट आणि रॉन गुथ यांच्या 100 मौल्यवान अमेरिकी नाण्यांच्या यादीत हे नाणं सहाव्या क्रमांकावर होतं. यावरून ते किती दुर्मीळ होतं हे लक्षात येईल. जगभरात अशी काही नाणी आहेत जी अत्यंत मोजक्या संख्येनं शिल्लक आहेत. त्यामुळं त्याचं मूल्य प्रचंड आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Online shopping