नवी दिल्ली, 17 जुलै: प्रत्येकाला भविष्याची चिंता असते. त्या दृष्टीने प्रत्येकजण आर्थिक नियोजन करत असतो. त्यासाठी काहीजण जीवन विमा घेतात. काहीजण बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी ठेवतात. आर्थिक नियोजन कोणत्याही प्रकारचे असू शकतं. मात्र त्यामुळे विशेषतः सेवानिवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये अशाप्रकारचं असायला हवं. बऱ्याचदा लोकांना म्हातारपणी गरजा पूर्ण करणं अवघड जातं. त्यातच जर पती आणि पत्नी असे दोघंच राहत असतील तर अजूनच अडचणींना तोंड द्यावं लागतं. आपल्याला जर म्हातारपणी आर्थिक चणचण भासत असेल तर अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयची (SBI) रिव्हर्स मॉर्गेज लोन स्कीम (Reverse Mortgage Loan Scheme) आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच म्हातारपणी प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारे आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारी योजना म्हणून SBI च्या रिव्हर्स मॉर्गेज लोन स्कीमकडे पाहिलं जाऊ शकतं.
हे वाचा-Paytm आणणार 16600 कोटींचा IPO, कंपनीने SEBI कडे जमा केली कागदपत्र
रिव्हर्स मॉर्गेज लोन स्कीम ही नेहमीच्या गृह कर्जापेक्षा (Home Loan) पूर्णतः वेगळी आहे. गृहकर्जाचा हप्ता (EMI) आपल्याला प्रत्येक महिन्याला द्यावा लागतो. मात्र SBI च्या या स्कीममध्ये घर तारण ठेवून दर महिन्याला आपल्याला ठराविक रक्कम बँकेकडून देण्यात येईल. विशेष म्हणजे आपल्याला त्याचं घरामध्ये राहून दर महिन्याला ठराविक रक्कम मिळत राहील. मात्र हे घर स्वतःच्या मालकीचं असायला हवं. तसंच त्याचा वापर कोणत्याही व्यवसायासाठी केलेला नसावा, अशी माहिती एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. Zeebiz ने याबाबत वृत्त दिलं आहे.
या योजनेचा व्याज दर (Interest Rate) कमी आहे. तसेच प्रोसेसिंग फी (Processing Fee) सुद्धा कमी आहे. बऱ्याच योजनांमध्ये हिडन चार्जेस (Hidden Charges) असतात. या चार्जेसबद्दल प्रक्रिया पूर्ण करताना आपल्याला माहिती नसते. मात्र स्टेटमेंट जारी झाल्यानंतर आपल्याला समजतं. मात्र SBI च्या या योजनेमध्ये असे कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत. कर्जाच्या रक्कमेच्या फक्त 0.5 टक्के प्रोसेसिंग फी असेल. प्रोसेसिंग फीसाठी कमीत कमी 2000 आणि जास्तीत जास्त 20,000 रुपये द्यावे लागतील. मात्र प्रोसेसिंग फी वर कर द्यावा लागेल.
हे वाचा-अॅड्रेस प्रूफशिवाय खरेदी करू शकता LPG गॅस, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेद्वारे 10-15 वर्षासाठी कर्ज मिळेल. सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणं आवश्यक आहे. केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ती व्यक्ती सिंगल बॉरोअर आणि 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाची असावी. ज्वॉइंट लोनसाठी (Joint Loan) जोडीदाराचे वय कमीत कमी 58 वर्ष असावं. या स्कीमद्वारे कमीत कमी 3 लाख आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल.
SBI नं दिलेल्या माहितीनुसार, कर्ज मंजूर झाल्यानंतर ॲग्रिमेंट (Agreement) आणि मॉर्गेजवर स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty), प्रापर्टी इन्शुरन्स प्रीमियम (Property Insurance Premium) आणि सीआरएसएआय (CRSAI) रजिस्ट्रेशन फी (Registration Fee) कर्ज घेणाऱ्यालाच भरावी लागेल. CRSAI फी ही 5 लाखांच्या मर्यादेवर 50 रुपये तर 5 लाखांपेक्षा जास्त मर्यादेवर 100 रुपये असेल. त्यावर अतिरिक्त GST सुद्धा द्यावा लागेल. अशा प्रकारे कमी चार्जेस असणारी ही योजना म्हातारपणी आपल्याला मोठा आधार देणारी ठरेल. या योजनेबद्दलची सर्व माहिती आपल्याला SBI च्या वेबसाईटवर मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan, SBI, SBI bank, SBI Bank News