नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर: जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SBI ने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने असे म्हटले आहे की, सणासुदीच्या काळात एका दिवसासाठी बँकेच्या सर्व ऑनलाइन सेवा बंद राहणार आहेत. दरम्यान या काळात एटीएम सेवा सुरू राहणार आहेत. एसबीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
एसबीआयने या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'आम्ही ग्राहकांना चांगला अनुभव घेता यावा याकरता आमचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपग्रेट करत आहोत. हे अपग्रेड होत असताना आमची इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट 8 नोव्हेंबर 2020 रोजी बाधित होऊ शकते. आम्ही तुमच्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करत आहोत.'
ग्राहकांनी त्यांची काही महत्त्वाची कामं आज पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचा खोळंबा होऊ नये याकरता बँकेने ट्वीट करून माहिती दिली आहे. एसबीआय च्या नेटबँकिंग साइटच्या माध्यमातून जरी कोणते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरीही समस्या उद्भवू शकते.
एसबीआय ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सुलभ अशा YONO App चा वापर केला जातो. दरम्यान बँकेने जारी केलेल्या अलर्टमध्ये असे म्हटले आहे की, योनो आणि योनो लाइटच्या सेवा यांवर देखील आजच्या अपग्रेडेशन प्रोसेसचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आज या अॅप संबंधित कोणतेही काम काढल्यास त्यांच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.
तुम्हाला तुमच्या एसबीआय खात्यातील बॅलन्स तपासायचा आहे तर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 9223766666 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्याचप्रमाणे SMS च्या माध्यमातून शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 09223766666 या क्रमांकावर BAL असा मेसेज पाठवलात की तुम्हाला हवी असलेली माहिती मिळेल. याकरता तुमचा मोबाइल क्रमांक एसबीआयमध्ये रजिस्टर्ड असणे अत्यावश्यक आहे.