छोटी बचत मोठा फायदा ! सरकारच्या टॉप 5 बचत योजनांची सविस्तर माहिती

छोटी बचत मोठा फायदा ! सरकारच्या टॉप 5 बचत योजनांची सविस्तर माहिती

छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करुन मोठा फायदा मिळवता येतो. जाणून घेऊया 5 महत्वाच्या गुंतवणूक योजनांबद्दल.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर: वैयक्तिक गुंतवणूक करायची असल्यास लहान गुंतवणुकीच्या योजना खूप फायदेशीर आहेत. या लहान योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनांचा समावेश आहे. या योजनांमध्ये कोणत्याही वयोगटातले गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात परंतू, या योजना दीर्घकालीन असून यामध्ये कमी कालावधीसाठी गुंतवणूक करता येत नाही. या छोट्या गुंतवणूक योजनांविषयी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

1)सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांमध्ये सध्या सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक 7.6 टक्के व्याज देण्यात येत आहे. या योजनेत जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींचं खातं सुरु करता येतं. मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. यासाठी खातं उघडल्याच्या दिवसापासून तुम्हाला 15 वर्ष गुंतवणूक करायची असून मध्येच तुम्ही ही योजना बंद करू शकत नाही. वर्षभरात तुम्ही या खात्यावर दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. हे खाते सुरु केल्यानंतर 21 वर्षांनी मॅच्युअर होणार असून यादरम्यान तुम्हाला 15 वर्ष यामध्ये गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्हाला आयकरामध्ये देखील सूट मिळणार आहे.

2)नॅशनल पेन्शन स्कीम

ही गुंतवणूक योजना निवृत्तीनंतर खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेत तुम्ही निवृत्त होईपर्यंत विशिष्ट्य रक्कम गुंतवू शकता. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 60% रक्कम एकरकमी काढता येते. 40% रकमेची अन्युइटी स्कीम घ्यावी लागते ज्यामुळे निवृत्तीनंतर ठराविक काळाने निश्चित उत्पन्न मिळत राहील. यातील गुंतवणूक वयाच्या 60 पर्यंत लॉक होत असल्याने ही गुंतवणूक केवळ पेन्शनसाठी उपयुक्त आहे.

3)सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (‘PPF’)

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही योजना करमुक्त बचतीसाठी आहे. या योजनेत तुम्ही 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करून वर्षाला 7.1  टक्के इतका परतावा मिळू शकतो. पीपीएफ योजनेचा कालावधी 15 वर्षे आहे. मॅच्युरिटीनंतर हवे असल्यास आणखी 5 वर्षेदेखील चालू ठेवता येते. या योजनेत वर्षभरात दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक तुम्ही करू शकता. त्यामुळे या खात्यात भरलेल्या रकमेवर विहित मर्यादेत 80C अंतर्गत कर सवलत  सवलत मिळेल. 15 ते 20 वर्ष तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची आहे. यानुसार तुम्ही प्रत्येकवर्षी किमान 500 रुपयांपासून दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. दरवर्षी दीड लाख गुंतवल्यास केल्यास 15 वर्षानंतर तुम्हाला 40 लाख रुपये एकत्रित रक्कम मिळणार आहे. 5  वर्षांनी तुम्ही तेव्हा जमा असलेल्या रकमेतील काही भाग काढू शकता.

4)जेष्ठ नागरिक बचत योजना  (‘SCSS’)

सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना हमी परतावा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना 2004 सुरु केली होती. या योजनेत 60 वर्षांपुढील जेष्ठ नागरिक एकटे किंवा जॉईंट अकाऊंटच्या माध्यमातून 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून गरज असेल तर यामध्ये 3 वर्षांची वाढ करण्यात येऊ शकते. या योजनेत  7.4 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं. त्याचबरोबर आयकराच्या 80C या कलमाअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या व्याज रकमेवर सूट मिळू शकते. ठेवीवर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे आणि लागू असलेल्या टीडीएसवर कर वजा केला जातो. यासाठी कर लागू नये किंवा टीडीएस कापला जाऊ म्हणून 15 एच किंवा 15 जी फॉर्म भरून दिल्यास तुमचा आयकर माफ होऊ शकतो. त्याचबरोबर 80TTB कलमांतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर सूट देण्याचा दावा देखील गुंतवणूकदार करू शकतो.

5)राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (‘NSC’)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना 5 वर्ष कालावधीची असून यामध्ये वर्षभरात दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. या योजनेत इन्स्ट्रुमेंटवर मिळविलेले व्याज कर ब्रेकसाठी मानले जाते कारण एनएससीमध्ये त्याची पुन्हा गुंतवणूक केली जाते. एनएससी 5 वर्षांच्या कालावधीसाठी कंपाऊंडिंग बेनिफिट्ससह स्थिर परतावा देते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश रक्कम असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर योजना आहे.

गुंतवणूकदारांसाठी सूचना : गुंतवणूकदाराने ही गुंतवणूक करताना स्वतःच्या जोखमीबद्दल आणि भविष्यातील उद्दिष्टांबद्दल नेहमी जागरूक असले पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला गुंतवणुकीतून काय आवश्यक आहे हे ठरवून मग फायदेशीर योजनेत गुंतवणूक करायला हवी.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 25, 2020, 11:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading