Home /News /money /

चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, कर्जाच्या कचाट्यात अडकलात? मिळवा 'अशी' मुक्तता

चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, कर्जाच्या कचाट्यात अडकलात? मिळवा 'अशी' मुक्तता

कर्ज हे नाव छोटं असलं तरी त्याची व्याप्ती तितकीच मोठी आहे. एकदा कर्ज घेतलं की त्याची परतफेड होईपर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

    प्रत्येक जण घर, कार खरेदी, मुलांचं शिक्षण आदी गोष्टींसाठी आर्थिक नियोजन (Financial Planning) करत असतो. सध्याच्या महागाईच्या काळात मिळणाऱ्या उत्पन्नातून बचत (Saving) करणं काहीसं कठीण आहे. त्यातूनही अनेक जण विशिष्ट हेतूनं बचत करत असतात. बऱ्याचदा घर किंवा कार खरेदीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य महत्त्वाच्या गोष्टीसाठी कर्जाचा (Loan) पर्याय निवडला जातो. कर्ज हे नाव छोटं असलं तरी त्याची व्याप्ती तितकीच मोठी आहे. एकदा कर्ज घेतलं की त्याची परतफेड होईपर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एखाद्या आपत्कालीन स्थितीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे आर्थिक संकट (Financial Crisis) निर्माण झालं, तर कर्जाची परतफेड मुश्कील होते. त्याचप्रमाणे इतर खर्च भागवताना नाकी नऊ येतात. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढू लागतो. अशा स्थितीत काही गोष्टी पाळल्यास कर्जाचा बोजा निश्चितच कमी होऊ शकतो. 'आज तक'ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आपण बऱ्याचदा खास उद्देशानं कर्ज घेतो; पण नोकरी गेली किंवा एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली, तर त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होतं. अर्थात याचा परिणाम कर्जाच्या हप्त्यावर होतो. त्यातच क्रेडिट कार्डची बिलं, इतर कर्जांचे हप्ते, महिन्याचा खर्च आदी गोष्टींमुळे कर्जाचा बोजा वाढतो. त्यामुळे कर्ज हा विषय चिंतेचं कारण ठरतो. अशा परिस्थितीत माणूस हताश होतो. काही गोष्टी केल्यास कर्जाचा भार निश्चितच कमी होण्यास मदत होते. एका कर्जामुळे दुसरं कर्ज मिळत नसेल तर तुमची बचत किंवा प्रॉपर्टी या संकटातून बाहेर येण्यासाठी उपयुक्त ठरते. तुम्ही बचत केलेल्या पैशांमधून कर्ज फेडू शकता किंवा प्रॉपर्टी गहाण (Property mortgage) ठेवून, काही प्रॉपर्टी विकून कर्जाची परतफेड करू शकता. तुम्ही शेअर्समध्ये (Share) गुंतवणूक केली असेल तर त्याच्या मदतीनंही कर्जाचं संकट दूर होऊ शकतं. (एकाचवेळी दोन कंपन्यांमध्ये करा काम, स्विगीची कर्मचाऱ्यांसाठी भन्नाट ऑफर) कर्ज परतफेडीसाठी तुम्ही गोल्ड लोनचा (Gold Loan) पर्याय निवडू शकता. तुम्ही सोन्याचे दागिने किंवा नाण्यांच्या बदल्यात रक्कम मिळवून त्यातून कर्जाची परतफेड करू शकता. प्रॉपर्टी गहाण किंवा विकून टाकण्यापेक्षा हा सर्वोत्तम उपाय आहे. या कर्जावर वर्षाला सुमारे आठ ते 15 टक्के व्याज द्यावं लागतं. यापेक्षा जास्त व्याजदर असलेलं कर्ज तुम्ही घेतलं असेल तर हा उपाय करायला काहीच हरकत नाही. एकदा कर्जाच्या जाळ्यात अडकल्यानंतर नवं कर्ज घेऊन जुनं कर्ज फेडण्याचा पर्याय संपुष्टात येतो. कारण ईएमआय (EMI) भरण्यात चूक झाल्यास त्याचा विपरीत परिणाम सिबिल स्कोअरवर (Cibil Score) होतो. सिबिल रिपोर्ट खराब झाल्यावर तुम्हाला दुसरं कर्ज मिळू शकत नाही. कोणतीही बॅंक (Bank) किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर तपासते. तुम्ही आर्थिक संकटात असाल आणि कर्जाचे हप्ते भरू शकत नसाल, तर ज्या बॅंकेकडून कर्ज घेतलं आहे, त्या बॅंकेच्या अधिकाऱ्यांना भेटून तुमची सत्य स्थिती सांगा. तसंच कर्ज भरण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती करा. यामुळे ईएमआयवरचा भार कमी होईल. तसंच अवधी मिळाल्याने तुम्ही उत्पन्नाचे नवे स्रोत किंवा पर्याय शोधू शकाल. तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर कर्ज आणि पेंडिंग बिल अदा करण्यासाठी काटेकोर नियोजन करा. तुमच्या सर्व थकित कर्जांची यादी तयार करा. त्यानंतर कोणतं कर्ज सर्वांत आधी फेडायचं ते ठरवा. क्रेडिट कार्ड लोन किंवा बिलासारखं सर्वांत मोठं आणि जास्त व्याजदर असलेलं कर्ज सर्वप्रथम फेडण्याला प्राधान्य असावं.
    First published:

    Tags: Home Loan, Loan

    पुढील बातम्या