कोलकाता, 12 जानेवारी : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात परिणाम झालेल्या उद्योगधंद्यांनी आता 2021 मध्ये नव्याने विचार करायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे आणि ते लोकांच्या पचनीही पडलं आहे. याचाच फायदा घेऊन मोठमोठ्या कंपन्या आपल्या रणनीतितच बदल करत आहेत. त्यापैकी एक मोठी कंपनी आहे रिलायन्स जिओमार्ट. जिओमार्टच्या माध्यमातून रिलायन्स ऑनलाइन किराणा आणि एफएमसीजी उत्पादनं विकते. आता रिलायन्सने नीतीत बदल केला असून रिलायन्स थेट तुमच्या-आमच्या घराजवळच्या किराणा दुकानदारांच्या माध्यमातून किराणा माल आणि एफएमसीजी उत्पादनांची विक्री करणार आहे, अशी माहिती या उद्योगातील अभ्यासक सूत्रांनी दिली आहे.
बिग बास्केट, अमेझॉन आणि ग्रोफर्स यासारख्या स्पर्धकांसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी रिलायन्सने ही नवी नीती निश्चित केली आहे. यात जिओच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर होणार आहे पण प्रत्यक्ष जिओ मार्टच्या वतीने मालाची डिलिव्हरी न होता ती ग्राहकांच्या जवळच्या किराणा माल व्यापाऱ्यामार्फत होणार आहे.
कशी असेल नवी पद्धत?
किराणा दुकानदार रिलायन्सकडून किंवा इतर कुठूनही आपला माल खरेदी करू शकतो. किराणा दुकानदार साधारणपणे 300 ते 400 लोकप्रिय वस्तू दुकानात ठेवतात. एखाद्या ग्राहकाने जिओमार्टवरून आपली मागणी नोंदवली आणि त्या दुकानदाराकडे ती वस्तू नसेल तर रिलायन्स ती वस्तू दुकानदाराला आणून देईल. पुढे ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. तसंच त्या वस्तूचं कमीशन रिलायन्स आणि दुकानदार समप्रमाणात वाटून घेतील.
रिलायन्स सुरू ठेवणार याची विक्री
जिओमार्टमार्फत किराणा माल आणि एफएमसीजी उत्पादनं रिटेल पद्धतीने न विकण्याचा निर्णय जरी रिलायन्सने घेतला असला तरीही नाशवंत पदार्थ म्हणजे फळं, भाज्या असा शेतीमाल याची विक्री मार्टच्या माध्यमातून करणार आहे.
बी2बी बिझनेस
या सूत्रांनी सांगितलं,‘रिलायन्सने बी2बी कॅश अँड कॅरी स्टोअर फॉरमॅट म्हणजे रिलायन्स मार्केट सुरू ठेवायचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून मार्टसाठी डिलिव्हरी करणाऱ्या किराणा दुकानदारांना तसंच बी2बी स्टोअर्सना माल पुरवला जाणार आहे. किराणा दुकानदार त्यांची मागणी ऑनलाइन नोंदवतील आणि मार्टमधून त्यांच्या दुकानात माल पाठवला जाईल.’
हे ही वाचा-सातत्याने महागणाऱ्या खाद्य तेलामुळे सामान्यांचं बजेट बिघडलं, कधी मिळणार दिलासा?
कधीपासून थेट विक्री होणार सुरू?
जूनच्या तिमाहीपर्यंत भारतातील 30 शहरांमध्ये ही थेट विक्रीची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा जिओमार्टचा मनोदय आहे. आतापर्यंत 56 हजार किराणा दुकानदारांनी रिलायन्ससोबत काम करायची तयारी दर्शवली आहे. एप्रिलपर्यंत 100 शहरांत दुकानदारांना रिलायन्सकडे नाव नोंदवता येणार आहे. रिलायन्सकडून किराणा दुकानदारांना माल पोहोचवण्याची यंत्रणा प्रायोगिक तत्वावर सुरूही झाली आहे. ते व्यवसाय तज्ज्ञ म्हणाले, ‘ जिओ मार्टने किराणा दुकानांमार्फत सेल्स करण्याचं हायब्रीड मॉडेल आणलं आहे. ज्या पिन कोड एरियात आमचे भागीदार नाहीत त्या भागात किराणा दुकानदारांशी करार होईपर्यंत रिलायन्स स्टोअर मालाचा पुरवठा करणार आहे. ’
रिलायन्सकडून उत्तर नाही.
कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच रिलायन्सने हे स्पष्ट केलं होतं की रिलायन्स कंपनी या पुढे कॉन्ट्रॅक्ट आणि कॉर्पोरेट फार्मिंग या क्षेत्रात उतरणार नसून शेतीची जमीनही खरेदी करणार नाही. सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचा फायदा रिलायन्सला होणार आहे अशी माहिती पसरल्याने पंजाबातील कंपनीच्या संपत्तीची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर रिलायन्स म्हणालं, ‘ रिलायन्सच्या विरोधक कंपन्यांनी रिलायन्सविरुद्ध एक अभियान राबवलं आहे ज्याला कुठलाही खरा आधार नाही. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन आमच्या विरोधकांनी चिथावल्यामुळे समाजकंटकांनी आमच्या संपत्तीचं नुकसान केलं आहे.’
हे ही वाचा-SBI Alert: ATM चा वापर करताय? या 9 गोष्टी लक्षात ठेवाच; अन्यथा नुकसानीची शक्यता
आतापर्यंत जिओमार्ट या वेबसाइटवरून मागणी केलेल्या वस्तुंची डिलिव्हरी रिलायन्स स्टोअर्सच्या माध्यमातून केली जात होती. अमेझॉननी मात्र फूड आणि ग्रोसरी युनिट अमेझॉन रिटेलमध्ये गुंतवणूक केली आहे.
जिओ मार्टची क्षमता काय?
जिओ मार्ट हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 3 लाख फूड आणि किराण्याच्या ऑर्डर्स दररोज पूर्ण करतं यापैकी 70 टक्के ऑर्डर्स त्यांच्या नेहमीच्या ग्राहकांच्या असतात. रिलायन्सची 50 ते 80 हजार स्क्वेअर फुटांची देशात 51 रिलायन्स मार्केट आउटलेट आहेत. यापैकी 26 स्टोअर्सचा काही भाग रिलायन्स स्मार्ट सुपरमार्केट्समध्ये रुपांतरित केला गेला आहे. या स्टोअर्सचा उर्वरित भाग बी2बी सेंटर्समध्ये रूपांतरित केला जाणार आहे. कोरोनाच्या काळामुळे लोकांनी किराणा ऑनलाइन खरेदी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच कंपन्या नवे मार्ग चोखाळत आहेत.