Home /News /money /

SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी वाईट बातमी, आता अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार

SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी वाईट बातमी, आता अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार

एसबीआय क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी एक वाईट, पण महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट कार्डद्वारे 'ईएमआय'वर (EMI) खरेदी व्यवहार केल्यास ग्राहकांना आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क (Processing Fee) आणि कर (Tax) भरावा लागणार आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 2 डिसेंबर : देशातली सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट कार्डद्वारे 'ईएमआय'वर (EMI) खरेदी व्यवहार केल्यास ग्राहकांना आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क (Processing Fee) आणि कर (Tax) भरावा लागणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डने (SBI Credit Card) ई-मेलद्वारे ही माहिती सर्व ग्राहकांना दिली आहे. हा नियम आजपासून (1 डिसेंबर) लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ आजपासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करणं महागलं आहे. यासोबत ईएमआय ट्रान्झॅक्शनवर अतिरिक्त शुल्क लागू करण्यासही सुरुवात झाली आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी एक वाईट, पण महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय क्रेडिट कार्डनं आपल्या ग्राहकांना ई-मेलच्या माध्यमातून माहिती देताना स्पष्ट केलं आहे की, "1 डिसेंबर 2021 पासून ईएमआय खरेदी व्यवहारांवर 99 रुपये प्रक्रिया शुल्क आणि कर लागू केला जात आहे. रिटेल आउटलेट, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह अन्य ई-कॉमर्स वेबसाइटवरून केल्या जाणाऱ्या सर्व ईएमआय ट्रान्झॅक्शनसाठी (EMI Transactions) ग्राहकांकडून प्रक्रिया शुल्क वसूल केलं जाणार आहे. खरेदीचं ईएमआयमध्ये रूपांतर करण्यावरच्या व्याज शुल्काव्यतिरिक्त हे शुल्क असेल." हेही वाचा : ATM मधून पैसे काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा पैसे अडकतील

  'बीएनपीएल' अंतर्गत वस्तू होणार महाग

  आजकाल अनेक मर्चंट वेबसाइट्स बाय नाऊ पे लॅटर (Buy Now Pay Later - BNPL) हा पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या पर्यायांतर्गत खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर हे शुल्क निश्चित परिणाम करणार आहे. यामुळे एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून 'बीएनपीएल'अंतर्गत खरेदी करणं ग्राहकांना आता महागात पडणार आहे. क्रेडिट कार्ड कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे, 'प्रिय कार्डधारक, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की 1 डिसेंबर 2021 पासून सर्व व्यापारी आउटलेट्स, वेबसाइट्स, अॅप्सवर केलेल्या सर्व ईएमआय व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क म्हणून 99 रुपये अधिक कर आकारला जाणार आहे.' हेही वाचा : Sovereign Gold Bond मधील गुंतवणूक कशी ठरते फायदेशीर, SBI ने सांगितली 6 कारणं

  प्रक्रिया शुल्काबाबत मिळणार माहिती

  जे व्यवहार यशस्वीपणे 'ईएमआय'वर रूपांतरित झाले आहेत, त्यांच्यावर हे शुल्क लागू होईल. 1 डिसेंबरपूर्वी केलेला कोणताही व्यवहार आणि 1 डिसेंबरला केलेल्या ईएमआय बुकिंगला या प्रक्रिया शुल्कातून सूट दिली जाणार आहे. रिटेल आउटलेटवर (Retail Outlets) खरेदी करताना, कंपनी कार्डधारकांना ईएमआय व्यवहारांवरच्या प्रक्रिया शुल्काविषयी चार्ज स्लिपद्वारे सूचित करेल. ऑनलाइन ईएमआय व्यवहारांसाठी पेमेंट पेजवर प्रक्रिया शुल्काविषयीची सूचना देण्यात येईल. ऑनलाइन ईएमआय ट्रान्झॅक्शनसाठी कंपनी पेमेंट पेजवर (Payment Page) प्रक्रिया शुल्काविषयीची माहिती देईल.

  ट्रान्झॅक्शन रद्द झाल्यास हे शुल्क परत मिळणार का?

  ईएमआय ट्रान्झॅक्शन रद्द झाल्यास प्रक्रिया शुल्क ग्राहकाला परत दिले जाईल; मात्र प्री-क्लोजर परिस्थितीत हे शुल्क परत मिळणार नाही. तसंच ईएमआयमध्ये कन्व्हर्ट झालेल्या ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉइंट (Reward Point) लागू नसतील.
  First published:

  पुढील बातम्या