मुंबई : भारतात सोन्याला खूप महत्त्व आहे. सोनं किंवा सोन्याचे दागिने ही भारतीयांसाठी महत्त्वाची संपत्ती आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे आणि दागिने हौसेने घालणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. पण गोल्ड हॉलमार्किंगचे नियम एप्रिल 1,2023 पासून बदलणार आहेत. गोल्ड हॉलमार्किंग हा एक स्टँप आहे. तो ग्राहकांना ते खरेदी करत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता दर्शवतो.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना अनिवार्य करण्यात आलेल्या नवीन हॉलमार्किंग नियमांबद्दल तपशीलवार माहिती दिली.
1 एप्रिल 2023 नंतर सर्व सोन्याचे दागिने आणि आर्टिफॅक्ट्सवर 6-अंकी अल्फान्युमरिक HUID किंवा हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असणं आवश्यक आहे. हा क्रमांक ग्राहकांना त्यांचे सोन्याचे दागिने हरवल्यास परत शोधण्यात आणि त्याची शुद्धता तपासण्यात मदत करेल.
सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक! मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, पाहा नवे दर
6 अंकी हॉलमार्क आयडी आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या BIS केअर अॅपच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. ती कशी तपासायची ते समजून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा. तसेच गोल्ड हॉलमार्किंगचे नवीन नियम कुठे अनिवार्य आहेत? ज्या लोकांकडे 4 अंकी हॉलमार्क सोन्याचे दागिने आहेत किंवा हॉलमार्किंग नसलेलं सोनं आहे त्यांनी या नव्या नियमामुळे काळजी करण्याची गरज आहे का? दावा केलेल्या सोन्याची शुद्धता आणि वास्तविकता यामध्ये तफावत असल्यास तुम्ही भरपाईचा दावा करू शकता का? या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं निधी खरे यांनी दिली आहेत.
निधी खरे यांच्या मते, 6-अंकी HUID अनिवार्य करण्याची खूप गरज होती. कारण 4-अंकी आणि 6-अंकी HUID कोडमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीमध्ये गोंधळ निर्माण होत होता. तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी हॉलमार्क नंबर तपासता का? तपासत नसाल तर यानंतर खरेदी करताना मात्र नक्की तपासा. कारण हा नवीन अनिवार्य 6-अंकी कोड तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी अधिक माहिती देऊन चांगली निवड करण्यात मदत करेल.
दरम्यान, सोन्याच्या दागिन्यांचं हॉलमार्किंग भारतात 2000 मध्ये सुरू झालं. सध्या दररोज 3 लाखांहून अधिक सोन्याच्या वस्तू HUID द्वारे हॉलमार्क केल्या जात आहेत, अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. याव्यतिरिक्त, देशभरातील 339 जिल्ह्यांमध्ये किमान एक असेइंग हॉलमार्क सेंटर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.